प्रामाणिकता काय असते, आधी हे वाचा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 12:54 AM2017-08-29T00:54:23+5:302017-08-29T00:55:03+5:30
माणसात प्रामाणिकपणा उरला नाही. प्रवृत्ती स्वार्थी होत आहे. रक्तातील नात्यावरचाही विश्वास उडत चाललाय, असं म्हटलं जातं.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : माणसात प्रामाणिकपणा उरला नाही. प्रवृत्ती स्वार्थी होत आहे. रक्तातील नात्यावरचाही विश्वास उडत चाललाय, असं म्हटलं जातं. पण अयोध्यानगरातील हेमंत पवारांनी नात्याच्याही पलीकडे माणुसकी जिवंत असल्याची प्रचिती त्यांच्या प्रामाणिकतेतून दाखवून दिली आहे. एखादा माणूस पाचशेची नोट सापडली तरी ती कुणाची आहे, हे शोधायच्या फंदात पडत नाही. पण हेमंत पवार यांनी चक्क १६ हजार ५०० आणि ७० हजारांची रक्कम असलेले डेबिट कार्ड परत केलेय. त्यांच्यातील माणुसकीला ‘सॅल्युट’च करायला हवा.
हेमंत पवार हे सद्गृहस्थ सोमवारी दुपारी ‘लोकमत भवन’येथे आले होते. या व्यक्तीचा शोध घ्या, मला पाकीट सापडलेय, अशी विनंती त्यांनी ‘लोकमत’च्या संपादकीय विभागातील सहकाºयांनी केली. काही वेळातच संबंधित व्यक्तीचा मोबाईल क्रमांक मिळविला आणि संपर्क करायला लावून त्याला पाकीट साभार परत केले. साईमंदिर रोड, अयोध्यानगर येथे राहणाºया हेमंत पवारांचे वय आज ६३ वर्षे आहे. महानगरपालिकेच्या मलेरिया-फायलेरिया विभागात मलेरिया वर्कर सेवा देऊन २०१३ मध्ये ते निवृत्त झाले. पत्नी व दोन मुले असलेल्या पवार यांचा मुलगा टॅक्सी चालवितो तर दुसरा खासगी कामे करतो. जेमतेम मिळणाºया निवृत्तिवेतनाच्या भरवशावर कुटुंबाचा सांभाळ सुरू आहे. सायकलने फिरणारा हा माणूस काही श्रीमंत नाही. परंतु आयुष्यभर जपलेल्या प्रामाणिकपणामुळे या सामान्य माणसाची उंची वाढली आहे. रोख रक्कम असलेले पाकीट परत करून त्यांनी माणुसकीचा परिचय करून दिला आहे.
हेमंत पवार नेहमीप्रमाणे रविवारीही आग्याराम देवी मंदिरात दर्शनाला गेले होते. घराकडे परत जात असताना बैद्यनाथ चौकानंतर कुसुमगर शोरुमसमोर त्यांना पाकीट सापडले. त्यात १६,५०० रुपये रोख रक्कम, बँकेचे कार्ड, वाहनांचे परवाने आणि काही महत्त्वाची कागदपत्रे होती. हे पाकीट राजेश माधव नंदेश्वर नामक व्यक्तीचे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. मात्र त्यात त्यांचा कुठलाही संपर्क क्रमांक नव्हता. कसे परत करायचे, या विचारात ते घरी पोहचले. त्यांनी ही बाब घरच्यांनाही सांगितली. पवार कुटुंबाचाही मोठेपणा म्हणजे सर्वांनी संबंधित व्यक्तीचे पाकीट परत करावे, अशी सूचना त्यांनी केली.
वास्तविक पाकीट सापडल्यानंतर हेमंत पवार त्यातील रोकड आणि बँकेचे कार्ड काढून त्याचा वापर करू शकले असते. १६,५०० हजारामध्ये त्यांच्या कुटुंबाचा महिनाभराचा खर्च निघाला असता. मात्र हा पैसा आपला नाही व तो आपल्याला आयुष्यभर पुरणार नाही, हा प्रामाणिक विचार त्यांच्या मनात आला. पाकीट पोलिसांच्या स्वाधीन करावे, असा विचार पवार यांनी केला होता. मात्र त्यांना खात्री नव्हती. लोकमतमध्ये गेल्यास संबंधित व्यक्तीपर्यंत त्याची अमानत पोहचेल, असा विश्वास त्यांना वाटला. त्यामुळे सोमवारी त्यांनी लोकमत कार्यालय गाठले. विशेष म्हणजे पाकीट परत करून खूप मोठा पराक्रम करतोय, असा अहंपणाही त्यांच्या चेहºयावर नव्हता.
लोकमतच्या सहकाºयांनीही संपर्क क्रमांकाची शोधाशोध करून पंचशील चौक, राणी दुर्गावती चौक येथे राहणाºया राजेश नंदेश्वर यांना कार्यालयात बोलावून घेतले. दोन दिवसानंतर आपले पाकीट जशाचे तसे परत मिळेल, ही अपेक्षाही नंदेश्वर यांनी सोडली होती.
मात्र पाकीट परत घेताना हेमंत पवार यांचा प्रामाणिकपणा पाहून त्यांचेही डोळे पाणावले. त्यांनी सांगितले, बँकेचे एटीएम कार्ड तर त्यांनी ब्लॉक केले, मात्र दोन दिवसापासून क्षणोक्षणी पैसे गेल्याचा पश्चाताप होत होता. पत्नीलाही धक्का बसला होता. मात्र आज पाकीट मिळाल्याची गोष्ट सांगितली तेव्हा तिचाही विश्वास बसला नाही.
ही घटना म्हणजे जगातील चांगल्या विचारांचा विजयच आहे, असे मानल्यास चूक ठरणार नाही.
आयुष्यभर नोकरी करताना कुणाचा एक रुपयाही घेतला नाही. पाकिटातील पैसे पाहून ते स्वत: ठेवावेत असा विचारही मनात आला नाही. कुटुंबालाही तसे वाटले नाही. दुसºयाचे पैसे काय आयुष्यभर थोडे पुरणार आहेत? त्यामुळे ज्याचे पैसे त्याला मिळाले याचे समाधान वाटत आहे.
- हेमंत पवार
दोन दिवसानंतर पाकीट आणि पैसे मिळतील याची अपेक्षाच सोडली होती. मात्र चांगली माणसे आणि माणुसकी शिल्लक आहे, याचा विश्वास वाटत आहे. या प्रामाणिक माणसाचा गौरव आणि मला मदत केल्याबद्दल लोकमतचेही धन्यवाद.
- राजेश नंदेश्वर