१०९ वेळा छापा मारण्यासारखे अनिल देशमुखांकडे आहे तरी काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2022 09:24 PM2022-06-06T21:24:35+5:302022-06-06T21:25:28+5:30
Nagpur News अनिल देशमुख यांच्या घरी तब्बल १०९ वेळा छापा मारण्यात आला. एवढे वेळा छापे मारण्यासारखे असे त्यांच्याकडे आहे तरी काय, असा सवाल करीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कारवाईवर प्रश्नचिन्ह लावले.
सुप्रिया सुळे यांच्याकडून कारवाईवर प्रश्नचिन्ह
नागपूर : ज्या माणसावर आरोप आहे, तोच आता माफीचा साक्षीदार होत आहे. अनिल देशमुख यांच्या घरी तब्बल १०९ वेळा छापा मारण्यात आला. हा कदाचित जागतिक विक्रम असेल. याचा अर्थ १०८ वेळा त्यांच्याकडे काहीच सापडले नाही का, एवढे वेळा छापे मारण्यासारखे असे त्यांच्याकडे आहे तरी काय, असा सवाल करीत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी कारवाईवर प्रश्नचिन्ह लावले.
त्या म्हणाल्या, नवाब मलिक यांच्यावरही नागपूरच्या नेत्याने तीनशे कोटींचा आरोप केला. मग, ५५ लाखांचा केला आणि आता पाच लाखांचा आकडा समोर आला आहे. मात्र ज्या पद्धतीने केंद्र सरकारकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर होत आहे, असे आजवर पाहिलेले नाही, अशा शब्दांत त्यांनी नाराजी व्यक्त केली.
राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याचे सुप्रिया सुळेंकडून पुन्हा समर्थन
या देशामध्ये अनेक पक्ष आहेत. प्रत्येक पक्षाला, नेतृत्वाला, कार्यकर्त्यांना त्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा असणे गैर नाही आणि नवीनही नाही, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री होण्याच्या वक्तव्याचे समर्थन केले. काश्मीरमध्ये पाच दिवसांत सात लोकांची हत्या झाली, त्यांच्याबद्दल काय, त्यासाठी केंद्र सरकार जबाबदार आहे, असा आरोप करीत केंद्र सरकार चित्रपटात व्यस्त असून, वास्तवाच्या दूर असल्याची टीका त्यांनी केली.
राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार
- राज्यसभा निवडणुकीत घोडेबाजार होत आहे, हे दुर्दैवी आहे. महाविकास आघाडीचे अनेक नेते भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना भेटले. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला. मात्र, दुर्दैव आहे की महाराष्ट्रात अनेक वर्षांनंतर अशी गोष्ट होत आहे. ही कुठल्याही सुसंस्कृत राज्यासाठी चांगली बाब नाही, असा चिमटाही त्यांनी काढला. आमचे दोन नेते काहीही न करता तुरुंगात आहेत हा आमच्यावर आणि आमच्या दोन्ही नेत्यांवर अन्याय आहे. दोघांना मतदानाची संधी मिळावी यासाठी छगन भुजबळ स्वतः प्रयत्न करीत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या राज्यसभा निवडणूक आटोपू द्या, मग विधान परिषद निवडणुकीचे पाहू, असे सांगत त्यांनी विधान परिषद निवडणुकीसंदर्भातील प्रश्नाला बगल दिली.