नागपुरात धारावीची पुनरावृत्ती झाली तर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2020 06:46 PM2020-04-29T18:46:23+5:302020-04-29T18:48:42+5:30
नागपूर शहरात ४२४ झोपडपट्ट्या असून ४ लाखाहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. अशा परिस्थितीत धारावीची नागपुरात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी स्लम भागातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मुंबईतील धारावी झोपडपट्टी कोविड-१९ चे हॉटस्पॉट बनले आहे. कोरोनाबाधिताची संख्या वाढत असल्याने नागपूरही हॉटस्पॉट बनले आहे. नागपूर शहरात ४२४ झोपडपट्ट्या असून ४ लाखाहून अधिक नागरिक वास्तव्यास आहेत. अशा परिस्थितीत धारावीची नागपुरात पुनरावृत्ती होऊ नये यासाठी स्लम भागातील प्रतिबंधात्मक उपाययोजनांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कोरिनाबाधित रुग्णांची संख्या सर्वाधिक असलेल्या मध्य नागपूर, पूर्व व उत्तर नागपुरात झोपडपट्ट्यांची संख्या सर्वाधिक आहे. झोपडपट्टीत अनेक कुटुंबे आठ बाय आठच्या खोलीत वास्तव्यास आहेत. अशा परिस्थितीत या भागात संसर्ग झाल्यास त्याचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
स्वच्छ भारत अभियानांतर्गत मोठ्या प्रमाणात वैयक्ितक शौचालये उभारण्यात आली. परंतु अजूनही स्लाम भागात मोठ्या प्रमाणात सामूहिक व सार्वजनिक शौचालयांचा वापर केला जातो. दाट लोकवस्ती असल्याने संसर्गाचा अधिक धोका संभवतो. नागपूर शहरातील स्लम भागांत ६८ सार्वजनिक शौचालयांचा वापर केला जातो.
मध्य नागपुरात स्लममध्ये १,११,२७५ नागरिक
कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने हॉटस्पॉट ठरलेल्या मध्य नागपुरात १ लाख ११ हजार २७५ नागरिक झोपडपट्टीत वास्तव्यास आहेत. अशा परिस्थितीत या भागाच्या सुरक्षेकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
शहरातील झोपडपट्ट्या व वास्तव्यास नागरिक
क्षेत्र झोपडपट्ट्या लोकसंख्या
दक्षिण-पश्चिम ७३- ४०,०१५
मध्य नागपूर ६८- १,११,२७५
दक्षिण ५५- २८,३६५
उत्तर १०९- ६७,४११
पूर्व ९४- ७२,३२२
पश्चिम ५९- ५६,३८०