नागपूर कारागृहात चाललेय काय...? परत कैद्यांमध्ये राडा
By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 05:37 AM2023-10-18T05:37:45+5:302023-10-18T05:38:01+5:30
तीन कैद्यांकडून एकाला अधिकारी-कर्मचाऱ्यांसमोरच बेदम मारहाण : कैद्याकडून डोके आपटत आत्महत्येचा प्रयत्न
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मागील आठवड्यात कैद्यांच्या दोन गटांमध्ये झालेल्या हाणामारीनंतर नागपूर मध्यवर्ती कारागृह परत चर्चेत आले होते. मात्र हा प्रकार होऊन तीन दिवसदेखील उलटत नाही तो परत तसाच राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. आश्चर्याची बाब म्हणजे कारागृह प्रशासनाने हा प्रकार गुप्त ठेवण्याचा प्रयत्न केला. एका कैद्याने कारवाईपासून वाचण्यासाठी डोके आपटत आत्महत्या करण्याचादेखील प्रयत्न केला. एका आठवड्यातील दोन घटनांमुळे कारागृह प्रशासनातील कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे.
या घटनेबाबत रविवारी धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. मकोकाअंतर्गत कारवाई झालेला बाबू बकरी उर्फ विरेंद्र बबलसिंह रामगडिया (२५), चेतन उर्फ बहुना नंदकुमार पाल (२६) व आकाश चंद्रभान पराते (२२) हे कैदी मागील वर्षापासून मध्यवर्ती कारागृहात आहेत. गुरुवारी सकाळच्या सुमारास बडीगोल विभागात हा राडा झाला. शुभम उईके या कैद्याने कारागृहातील अधिकाऱ्यांजवळ काही कैद्यांची तक्रार केली. ते कैदी त्याला मारण्याचा प्रयत्न करत असल्याचा त्याचा दावा होता. तो बॅरेकमध्ये परत जात असताना तीनही कैदी त्याच्यावर लक्ष ठेवून होते. त्यांनी तुरुंगातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसमोरच त्याला गाठले व त्याला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली. अधिकाऱ्यांनी त्याला सोडविण्याचा प्रयत्न केला असता तिघेही आक्रमक झाले व त्यांनी उईकेचे कपडेच फाडले. अखेर वॉकीटॉकीवरून इतर कर्मचाऱ्यांना याची माहिती देण्यात आली. तेथे मोठ्या प्रमाणात अधिकारी-कर्मचारी पोहोचले. आता आपल्याला कठोर कारवाईचा सामना करावा लागेल या भितीने बाबू बकरीने कार्यालयासमोर असलेल्या कुंडीवर स्वत:चे डोके आपटणे सुरू केले. त्याच्या डोक्यातून रक्तस्त्राव होऊ लागला व तो खाली पडला. या प्रकारामुळे अधिकारी व कर्मचारीदेखील हबकले. चौघाही जखमी कैद्यांना पकडून कारागृह रुग्णालयात नेण्यात आले. हा राडा नेमका का झाला याची चौकशी सुरू आहे.
तीन दिवसांनंतर तक्रार का ?
दरम्यान हा प्रकार झाल्यानंतर चारही कैद्यांवर उपचार करण्यात आले. चार दिवसांअगोदरच कैद्यांमध्ये हाणामारी झाल्याने अधिकाऱ्यांनी अगोदर हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला. मात्र वॉकीटॉकीवर संदेश गेल्याने अनेकांना याची माहिती झाली होती. तरीदेखील तीन दिवस कारागृह प्रशासनाकडून कुठलीही तक्रार देण्यात आली नाही. अखेर धंतोली पोलीस ठाण्यात रविवारी तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी बाबू बकरी, पाल व परातेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
९ ऑक्टोबरलादेखील भडकले टोळीयुद्ध
९ ऑक्टोबर रोजी पहाटे कैद्यांच्या दोन गटांमध्ये टोळीयुद्ध सुरू झाले. अमली पदार्थ तस्कर नूर आलम अब्दुल अन्सारी नागपूर कारागृहात आहे. नूरचा प्रतिस्पर्धी गुन्हेगार अझहर उर्फ रोशन उर्फ मौजर खान अब्दुल हमीद खान आणि फरदीन खान अब्दुल हमीद खान यांच्याशी वाद सुरू आहे. अझहर आणि फरदीन यांनी तुरुंग अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसमोरच नूरवर टिनाच्या धारदार पत्र्याने हल्ला केला. तर नूरचे मित्र किशोर रामटेके व अस्लम शेख यांनी त्यांनी अझहर आणि फरदीनवर हल्ला केला होता.