जगातील सर्वात शक्तिशाली देशांच्या यादीत भारताचा कितवा नंबर? जाणून घ्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2024 02:39 PM2024-04-15T14:39:21+5:302024-04-15T14:39:40+5:30
ग्लोबल मार्केटिंग कम्यूनिकेशन कंपनी WPP च्या बीएवी ग्रुप आणि यूएस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्टने हे रँकिंग मॉडेल तयार केले आहे.
India: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2030 पर्यंत भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सरकारकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सरकारच्या प्रयत्नांमुळे मोठ-मोठ्या परदेशी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक वाढवली आहे. देशाचे संरक्षण क्षेत्रही झपाट्याने प्रगती करत आहे. भारतीय लष्कराकडे एकापेक्षा एक क्षेपणास्त्रे आणि शस्त्रे आहेत, जी शत्रूला एका रात्रीत पराभूत करू शकतात. तरीदेखील जागतिक स्तरावर पाहिले तर, भारत जगातील 10 शक्तिशाली देशांच्या यादीत नाही. एका अमेरिकन प्रकाशनाच्या अहवालात हा दावा करण्यात आला आहे.
'यूएस न्यूज अँड वर्ल्ड रिपोर्ट'ने जाहीर केलेल्या शक्तिशाली देशांच्या यादीत भारताला 12वे स्थान मिळाले आहे. रिपोर्टनुसार, इस्रायल, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, जपान, दक्षिण कोरिया, ब्रिटन, जर्मनी, रशिया, चीन आणि अमेरिका, हे जगातील 10 सर्वात शक्तिशाली देश आहेत. या यादीत फ्रान्स 11व्या आणि भारत 12व्या क्रमांकावर आहे. या क्रमवारीत दक्षिण कोरियानंतर जपानला स्थान मिळाले आहे.
हे रँकिंग मॉडेल ग्लोबल मार्केटिंग कम्युनिकेशन कंपनी WPP च्या BAV ग्रुप आणि US News & World Report यांनी संयुक्तपणे तयार केले आहे. यामध्ये भारताला 100 पैकी 46.3 गुण देण्यात आले आहेत. रिपोर्टनुसार, सॉफ्टवेअर कर्मचारी, व्यवसाय आउटसोर्सिंग सेवा आणि माहिती तंत्रज्ञान सेवांमध्ये भारतामध्ये प्रचंड क्षमता आहे, परंतु वारसा आणि सांस्कृतिक प्रभावासाठी देशाला जास्तीत जास्त गुण मिळाले आहेत. ही यादी देशाची शक्ती दर्शवणाऱ्या 5 वैशिष्ट्यांवर तयार करण्यात आली आहे. यामध्ये नेते, आर्थिक प्रभाव, राजकीय प्रभाव, मजबूत आंतरराष्ट्रीय संबंध आणि मजबूत सैन्याचा समावेश आहे.