हे कसले कोविड सेंटर?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 04:08 AM2021-03-25T04:08:41+5:302021-03-25T04:08:41+5:30
उमरेड : बऱ्याच प्रतीक्षेनंतर मंगळवारी सुरू करण्यात आलेल्या उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये बुधवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ऑक्सिजन सिलिंडरची सुविधा उपलब्ध ...
उमरेड : बऱ्याच प्रतीक्षेनंतर मंगळवारी सुरू करण्यात आलेल्या उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये बुधवारी सायंकाळी ७ वाजेपर्यंत ऑक्सिजन सिलिंडरची सुविधा उपलब्ध झाली नव्हती. विना ऑक्सिजनच्या या कोविड सेंटरमध्ये असुविधांचाही गोंधळ लोकमतच्या तपासातून उजेडात आला आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक संकुल येथे सदर कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे ३८ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत २३ रुग्ण औषधोपचारासाठी भरती असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक यांनी दिली.
कोरोनाबाधित काही रुग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास संभवतो. क्रिटिकल स्टेजमध्ये श्वास घेता येत नाही. शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावते. अशावेळी रुग्णाला ऑक्सिजन किंवा व्हेन्टिलेटर सपोर्टची गरज भासते. उमरेडच्या कोविड सेंटरमध्ये भरती असलेल्या रुग्णापैकी असे संकट कुणावर ओढवले तर मग ऑक्सिजनची व्यवस्था करताना काय अवस्था असेल याचा विचार न केलेलाच बरा. याबाबत डॉ. संदीप धरमठोक यांना विचारणा केली असता पाचगाव येथून ऑक्सिजनचे दोन सिलिंडर आणत आहोत. आज रात्री व्यवस्था होईल असे त्यांनी सांगितले. एकीकडे तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती मास्कची कारवाई धडाक्यात आणि काटेकोरपणे करीत आहे. दुसरीकडे कोविड सेंटरच्या सोयीसुविधांबाबत ही समिती उदासीन का, असा सवाल नागरिक विचारीत आहेत.
लाकडी बाक अन् हिरवी मॅट
स्व. यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक संकुलच्या एकाच हॉलमध्ये महिला आणि पुरुष रुग्णांची व्यवस्था करण्यात आली आहे. हॉलच्या मध्यभागी लाकडी बाकांची लांब रांग लावत त्या बाकांवर हिरवी मॅट टाकून महिला आणि पुरूष रुग्णांची विभागणी करण्यात आली आहे. येथील व्यवस्थेच्या संदर्भात रुग्णांनी नाराजी व्यक्त केली आहे.
-
स्वच्छतागृह आणि पाणी
महिला आणि पुरुष रुग्णांसाठी प्रत्येकी एका स्वच्छतागृहाची सुविधा येथे आहे. दोन-चार रुग्णांनी आंघोळ उरकवताच स्वच्छतागृहामध्येच पाणी साचते. सध्या २३ रुग्ण आहेत. यात वाढ झाल्यास केवळ दोन स्वच्छतागृहात व्यवस्था कशी होणार, असा प्रश्न रुग्णांचा आहे. शिवाय याठिकाणी पिण्यासाठी कोमट पाण्याचीही सुविधा अद्याप करण्यात आलेली नाही.
-
अधिकारी म्हणतात, जागा शोधा
उमरेड कोविड सेंटरच्या असुविधेबाबत तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप धरमठोक यांच्याशी चर्चा केली असता, चांगली जागा मिळविण्यासाठी तुम्ही सहकार्य करायला पाहिजे. आम्हाला जी जागा मिळाली, त्याठिकाणी उपचार सुरू आहेत. तुम्हीच जागा शोधा असे उत्तर त्यांनी दिले.