‘मालदा’ हिंसाचारावर साहित्यिक गप्प का?
By admin | Published: January 12, 2016 03:01 AM2016-01-12T03:01:06+5:302016-01-12T03:01:06+5:30
दादरी हत्याकांडांनंतर देशभरात असहिष्णुतेची ओरड करून साहित्यिकांनी पुरस्कार वापसीची मोहीमच सुरू केली. परंतु पश्चिम बंगालच्या ‘मालदा’मधील हिंसाचारावर कुणीही टिप्पणी केलेली नाही.
नागपूर : दादरी हत्याकांडांनंतर देशभरात असहिष्णुतेची ओरड करून साहित्यिकांनी पुरस्कार वापसीची मोहीमच सुरू केली. परंतु पश्चिम बंगालच्या ‘मालदा’मधील हिंसाचारावर कुणीही टिप्पणी केलेली नाही. दादरी व बाबरीच्या मुद्यावर प्रसिद्धी मिळविणारे साहित्यिक आता गप्प का आहेत, असा प्रश्न दिल्ली विद्यापीठाचे प्राध्यापक तसेच संघ विचारांचे अभ्यासक डॉ. राकेश सिन्हा यांनी येथे उपस्थित केला.
सनातन धर्म युवक सभेतर्फे ‘बौद्धिक दहशतवाद-एक आव्हान’ या विषयावर त्यांचे व्याख्यान झाले. गेल्या काही काळापासून देशात असहिष्णुतेच्या नावावर राजकारण सुरू आहे. त्यात प्रामुख्याने स्वत:ला डावे, समाजवादी व धर्मनिरपेक्ष म्हणवून घेणारे पक्ष आघाडीवर आहेत. काही साहित्यिकांना हाताशी धरून त्यांनी असहिष्णुतेचे स्तोम माजविले. परंतु हेच लोक एके काळी असहिष्णू होते व इतिहासात त्याची नोंद आहे, असा दावा सिन्हा यांनी केला. त्यांनी ‘एमआयएम’चे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांच्या धोरणांवरही टीका केली. एखाद्या व्यक्तीमध्ये विद्वत्ता असण्यासोबतच त्याचा दृष्टीकोनदेखील सकारात्मक हवा. अन्यथा बौद्धिक दहशतवादाचा जन्म होतो, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)