पवारांच्या एक दिवस आधीच आगमनाचे गूढ काय ?
By Admin | Published: September 22, 2015 04:42 AM2015-09-22T04:42:33+5:302015-09-22T04:42:33+5:30
विदर्भातील शेतकऱ्यांच्या भेटी व पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार
नागपूर : विदर्भातील शेतकऱ्यांच्या भेटी व पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे सोमवारी सायंकाळी नागपुरात आगमन झाले. पवार २२ रोजी येणार होते. मात्र, दौऱ्यात बदल करीत ते अचानक एक दिवस पूर्वीच सोमवारी सायंकाळी नागपुरात दाखल झाले. दौऱ्यात बदल करण्यामागे नेमके काय गूढ आहे, एक दिवस पूर्वीच येऊन पवार विदर्भात नेमकी कोणती रणनीती आखणार आहेत, अशा चर्चांना राजकीय वर्तुळात पेव फुटले आहे.
नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पवार यांचे नवनियुक्त शहर अध्यक्ष माजी मंत्री अनिल देशमुख व जिल्हाध्यक्ष माजी मंत्री रमेश बंग यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी स्वागत केले. यानंतर पवार मुक्कामासाठी एका हॉटेलमध्ये रवाना झाले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष (बीसीसीआय) जगमोहन दालमिया यांच्या अंत्यसंस्कारासाठी पवार कोलकाता येथे गेले होते. तेथून ते दिल्ली येथू जाऊन मुक्काम करणार होते. पण ऐनवेळी त्यांनी दिल्लीला न जाता नागपुरात एक दिवसपूर्वी पोहचून मुक्काम करणे निश्चित केले. स्थानिक नेत्यांना तसे निरोप मिळताच धावपळ सुरू झाली. पवारांच्या आगमनाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना निरोप दिले गेले. पवार एक दिवसपूर्वीच का येत आहेत, मंगळवारी दिवसभर ते नागपुरात काय करतील याची ठोस माहिती एकाही नेत्याकडे नव्हती. त्यामुळे नेत्यांनाही पुढील नियोजन करणे कठीण गेले. शेवटी नागपूर मुक्कामी रात्री पवार यांनी स्थानिक नेत्यांशी चर्चा करून पुढील दौरा निश्चित केला. रात्री ८.१५ वाजता पवार यांनी माजी महापौर कुंदाताई विजयकर यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. मंगळवारी सकाळी ९ वाजता पवार हे माजी केंद्रीय मंत्री मुकुल वासनिक यांची सांत्वना भेट घेतील. सकाळी ९.४५ वाजता काटोल तालुक्यातील हातला येथे जुनघरे यांच्या संत्रा बगिच्याची पाहणी करतील. याचवेळी काही शेतांमध्ये जाऊन सोयाबीनच्या झालेल्या नुकसानीचीही पाहणी करतील. त्यानंतर दुपारी ३ वाजता यवतमाळसाठी रवाना होतील. यवतमाळला शेतकऱ्यांच्या नियोजित भेटी आटोपवून २३ सप्टेंबर रोजी रात्री त्यांचे नागपुरात आगमन होईल.
विमानतळावर माजी शहर अध्यक्ष अजय पाटील, माजी जिल्हाध्यक्ष बंडू उमरकर, आ. प्रकाश गजभिये, माजी आ. दीनानाथ पडोळे, अतुल लोंढे, वेदप्रकाश आर्य, रमण ठवकर, दिलीप पनकुले, राजेश कुंभलकर, राजू नागुलवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)
पवारांनी कार्यकर्ता व
पोलिसांना फटकारले
४विमानतळावरून बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजुला पवार यांची गाडी लावण्यात आली होती. मात्र, त्या मार्गावर कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी गर्दी केली. त्यामुळे ऐनवेळी पवार यांना फिरून उजव्या बाजूच्या मार्गाने जावे लागले. त्यावेळी कार्यकर्त्यांनी स्वागतासाठी गर्दी केली. पवारांना पुढे चालणेही कठीण झाले होते. पुढे उभ्या ठाकलेल्या एका कार्यकर्त्याला पवारांनी अक्षरश: हात धरून बाजूला केले. गाडीजवळ पोहोचल्यावर पवार यांनी सुरक्षा व्यवस्थेत असलेल्या पोलिसांवरही नाराजी व्यक्त केली.
स्वागतासाठी अपेक्षित गर्दी नाही
४पवार यांचे २३ सप्टेंबर रोजी नागपुरात आगमन होणार होते. तेथून ते यवतमाळ येथे शेतकऱ्यांंच्या भेटीसाठी जाणार होते. २४ तारखेला नागपुरात पक्षाच्या विदर्भस्तरीय मेळाव्याला ते हजेरी लावणार होते. मात्र, सोमवारी अचानक पवार यांचा कार्यक्रम बदलला व ते सायंकाळी ५.३० वाजता नागपुरात येण्याचे निश्चित झाले. शहर व ग्रामीणचे अध्यक्षपद दोन माजी मंत्र्यांकडे सोपविण्यात आले आहे. यामुळे दौरा वेळेवर निश्चित झाला असला तरी पवारांचे जंगी स्वागत होणे अपेक्षित होते. पण विमानतळावर पवारांच्या स्वागतासाठी अपेक्षित गर्दी नव्हती. प्रमुख पदाधिकारी व शंभरएक कार्यकर्ते स्वागतासाठी पोहचले होते.