स्वामीनाथन आयोगाची गरजच काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2017 12:46 AM2017-11-14T00:46:58+5:302017-11-14T00:47:27+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहेत, असे असताना स्वामीनाथन आयोग लागू केल्यास फक्त दीडपटच भाव मिळेल.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी शेतकºयांचे उत्पन्न दुप्पट व्हावे यासाठी प्रयत्न करीत आहेत, असे असताना स्वामीनाथन आयोग लागू केल्यास फक्त दीडपटच भाव मिळेल. दीडपटपेक्षा दोनपट नक्कीच जास्त असल्याने शेतकºयांच्या फायद्याचे काय राहील, असा प्रतिसवाल राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोमवारी नागपुरात आयोजित एका पत्रपरिषदेत केला.
देशात स्वामीनाथन आयोग कधी लागू होणार, असा प्रश्न त्यांना पत्रकारांनी विचारला असता त्यांनी सरकार शेतकºयांसाठी करीत असलेल्या विविध धोरणांची माहिती दिली. केंद्र शासनाने कृषिमूल्य आयोगाने केलेल्या शिफारशींची गंभीरतेने दखल घेतली आहे. त्या माध्यमातून कृषिमालाच्या आयात-निर्यातीवर नियंत्रणाबाबत महत्त्वाचे ठराव घेण्यात आले आहेत. सध्या कृषिमालाचे भाव कमी असले तरी भविष्यात या निर्णयामुळे शेतकºयांच्या मालाला हमीभावापेक्षा अधिक भाव मिळेल, असा विश्वासही पाशा पटेल यांनी यावेळी व्यक्त केला.
सरकारने दोन लाख टनाच्यावर तूर डाळ व तीन लाख टनाच्यावर उडद डाळीच्या आयातीवर निर्बंध घालण्याचा निर्णय घेतला; शिवाय तूर डाळीवरील निर्यातबंदी हटविण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. भारतात ७० टक्के खाद्यतेलाची आयात विदेशातून होत असून, मोठ्या प्रमाणात पैसा बाहेर जातो. त्यामुळे रिफार्इंड तेलावर ४५ टक्के आणि क्रूड तेलावर ३५ टक्के आयात शुल्क लावण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यामुळे भविष्यात शेतकºयांच्या पिकांना चांगला भाव मिळेल. सोयाबीन, सूर्यफुलाच्या आयातीवरही शुल्क लावण्यात आले. शेतकºयांचा मालही निर्यात होत आहे. त्यास शासनाकडून प्रोत्साहन देण्यात येत आहे.
सध्या शेतमालाचे हमीभाव कमी असले तरी भविष्यात या धोरणाचा फायदा होणार असल्याचे ते म्हणाले. यावेळी त्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची प्रशंसा केली. सोयाबीनला कमी भाव मिळत असल्याच्या प्रश्नावर त्यांनी सोयाबीनवर मॉईश्चरचे प्रमाण अधिक असल्याने व्यापारी अधिक भाव देण्यास तयार नसल्याचे ते म्हणाले.
शेतकºयांनो सोयाबीन विकू नका
सोयाबीनला येत्या काळात चांगला भाव मिळणार आहे. त्यामुळे शेतकºयांनी सोयाबीन विक्रीसाठी घाई करू नये, असे आवाहन त्यांनी केले.
कापूस, सोयाबीनला बोनस द्या
कापसाला ५०० रुपये बोनस देण्यासोबतच धान आणि सोयाबीनला बोनस देण्याची मागणी आमदार आशिष देशमुख यांनी यावेळी केली.