कसले आले पोषण? हे तर बालकांचेच शोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2021 04:11 AM2021-09-04T04:11:25+5:302021-09-04T04:11:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत गरोदर माता, स्तनदा माता व सहा वर्षांखालील मुलांसाठी एकात्मिक बालविकास ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : महिला व बालविकास मंत्रालयांतर्गत गरोदर माता, स्तनदा माता व सहा वर्षांखालील मुलांसाठी एकात्मिक बालविकास सेवा प्रकल्पाअंतर्गत पोषण आहाराचा पुरवठा केला जातो. परंतु नागपुरात मात्र निकृष्ट व भेसळयुक्त आहाराचाच अधिक पुरवठा झाल्याचे धक्कादायक वास्तवच समोर आले आहे. लोकमतने केलेल्या पाहणीत साखरेत चक्क पांढरे खडे आणि चुना मिसळलेला होता. तिखटातही भेसळ होती. हळदीला रंग नव्हता. मुग डाळीतही भेसळ असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या. हा पोषण आहार म्हणावा की शोषण आहार, असा प्रश्न निर्माण झाला आहे. १ ते ७ सप्टेंबर हा पोषण आहार सप्ताह म्हणून साजरा केला जातो. या सप्ताहाच्या दुसऱ्याच दिवशी हा प्रकार उघडकीस आला आहे.
शहरात एकूण ९८१ अंगणवाड्या आहेत. लहान मुलांना पोषण आहार मिळावा, शाळेची ओढ वाढावी म्हणून बालकांना अंगणवाडीच्या माध्यमातून हा पोषण आहार दिला जातो. दर दोन महिन्यांनी हा आहार दिला जातो. यात तांदूळ (१९०० ग्रॅम), गहू (१९०० ग्रॅम,) मिरची पाावडर (२०० ग्रॅम), हळद (२०० ग्रॅम), मूगडाळ (१००० ग्रॅम), साखर (१००० ग्रॅम), मीठ (४०० ग्रॅम) आदी दिले जाते. दर दोन महिन्यांनी हा आहार लाभार्थ्यांना दिला जातो. हा आहार निकृष्ट व भेसळयुक्त असल्याच्या तक्रारी वारंवार होत असतात. रेशीमबाग प्रकल्पांतर्गत असलेल्या काही अंगणवाडीतील लाभार्थ्यांनीसुद्धा अशाच तक्रारी केल्या. लाेकमत चमुने प्रत्यक्ष त्यांची भेट घेऊन चर्चा केली. तेव्हा त्यांनी त्यांना मिळालेल्या आहार दाखवला तेव्हा त्यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. हा प्रकार केवळ काही अंगणवाडीतील नव्हे तर सर्वच अंगणवाड्यांचा आहे. जरीपटका, तांडापेठ, बांग्लादेश आदी परिसरात या पोषण आहाराच्या तक्रारी झालेल्या आहेत.
लाभार्थी म्हणतात...
-तब्बल चार महिन्यांनंतर आहार मिळाला. घरी आल्यावर बंद पॉकेट उघडले तेव्हा साखरेत पांढरे खडे असल्याचे दिसून आले. चुना मिसळलेला होता. मिरची पावडरमध्ये, तर भेसळ असल्याचे स्पष्ट दिसून येते. मूग दाळीत अनेक प्रकारच्या डाळी भेसळ आहेत.
-सूजित रामटेके, बाबू जगजीवनराम
- पोषण आहारत मिळत असलेल्या मिरची पावडरला काहीच चव नाही. त्यात भुसा मिसळला असल्याचे दिसून येते. तिखट पाण्यात विरघळत नाही. ही नेहमीचीच बाब आहे.
शुभांगी बोबडे, गरोबा मैदान
- पोषण आहारातील तिखट ही काहीच कामाची नाही. केवळ मूग डाळीतच भेसळ नाही, तर गहू सुद्धा निकृष्ट दर्जाचाच आहे. ही केवळ आजचीच बाब नाही तर हा नेहमीचाच प्रकार झाला आहे.
नताशा कांबळे, गरोबा मैदान