प्राधान्य कशाला, कर्तव्याला की ममतेला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2020 08:12 PM2020-06-06T20:12:50+5:302020-06-06T20:14:01+5:30
वर्तमानात कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूच्या प्रकोपापुढे अतिशय संवेदनशील असलेले भावनिक द्वंद्व प्रकर्षाने दिसून येत आहे. हीच घालमेल पेशाने शिक्षिका असलेल्या डॉ. वंदना दिलीप बडवाईक यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सजीवांच्या आयुष्यात ममतेला अनन्यसाधारण स्थान आहे. मातृत्वापासून सुरू झालेल्या या ममत्वाने संवेदनेच्या पंखावर स्वार होत अवघ्या ब्रह्मांडाला व्यापले आहे. मात्र, मानवाच्या आयुष्यात कर्तव्याला ममत्वापेक्षाही वरचे स्थान दिले गेले आहे. तेच कर्तव्य माणूस कुटुंबात कौटुंंबिक सदस्य होऊन तर कधी सामाजिक जीवनात नैतिकतेला प्राधान्य देऊन तर कधी सैनिक, डॉक्टर तर कधी वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या जबाबदाऱ्या पार पाडताना निभावत असतो. वर्तमानात कोविड-१९ अर्थात कोरोना विषाणूच्या प्रकोपापुढे अतिशय संवेदनशील असलेले भावनिक द्वंद्व प्रकर्षाने दिसून येत आहे.
हीच घालमेल पेशाने शिक्षिका असलेल्या डॉ. वंदना दिलीप बडवाईक यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली. त्यांची लाडकी छकुली याच वर्षी डॉक्टर झाली आणि इंटर्नशिपकरिता नागपुरातील हॉस्पिटलमध्ये रुजू झाली. तोच कोविड-१९ विषाणूने सगळे जगच हादरले. त्यामुळे डॉक्टरांची जबाबदारी प्रचंड वाढली. एरवी सीमारेषेवर शत्रूशी दोन हात करत जय मिळवणे तर कधी वीरगतीला प्राप्त होणाऱ्या सैनिकांची जागा डॉक्टरांनी घेतली. या डॉक्टरांमध्ये बडवाईक यांची लाकडी छकुली अर्थात नवखी डॉक्टरही आहे. अशा अनेक आहेत आणि छकुली ही त्यांचे प्रतिनिधित्व करते. तिचा याच महिन्यात वाढदिवस आहे. ती रोज हॉस्पिटलमध्ये पीपीई किट घालून कर्तव्य बजावते. शिफ्ट आटोपून घरी आली की स्वत:च क्वारंटाईन होऊन लगेच दुसºया दिवशी पुन्हा कर्तव्यावर हजर होते. वंदना यांनी, तिला तू सुटी घे आणि घरीच थांब असे म्हटले तर तिने ममतेने तिच्या कर्तव्याची जाणीव करवून दिली. ‘स्वत:च्या काळजीकरिता, सुरक्षेकरिता मी सुटी घेणे म्हणजे माझ्या पेशासोबत केलेली बेईमानीच ठरेल. एक डॉक्टर म्हणून मीच नांगी टाकली तर देशाचे कसे होईल’ असा सवाल उपस्थित करत तिने कर्तव्याला अग्रक्रम दिल्याचे डॉ. वंदना यांनी सांगितले. तिच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ गिफ्ट काय द्यावे, या विवंचनेत असतानाच तिच्या या उत्तराने माझी छकुली किती प्रगल्भ झाली, याची जाणीव झाली आणि माझा ऊर अभिमानाने भरून आला. तिनेच मला कर्तव्याची जाणीव करवून देत छानसे गिफ्ट दिल्याचे त्यांनी सांगितले. ती रुग्णालयातून घरी आली की आपले अनुभव शेअर करते. ते अनुभव माझा लहान मुलगा जो स्वत:ही डॉक्टरकीचे शिक्षण घेतो आहे, तो तन्मयतेने ऐकतो. यावरून ‘कोविड योद्धा’ कशा तऱ्हेने आपले कर्तव्य बजावतात आणि लोकांना वाचवतात याची त्याला जाणीव होत असल्याचे डॉ. वंदना बडवाईक यांनी सांगितले.