एकनाथ निमगडे हत्येच्या तपासात काय प्रगती झाली?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2021 04:07 AM2021-04-28T04:07:59+5:302021-04-28T04:07:59+5:30

नागपूर : संपूर्ण शहराला हादरविणाऱ्या व सुरक्षाव्यवस्थेबाबत चिंता करायला भाग पाडणाऱ्या आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्येच्या तपासात आतापर्यंत काय प्रगती ...

What progress has been made in the investigation of Eknath Nimgade murder? | एकनाथ निमगडे हत्येच्या तपासात काय प्रगती झाली?

एकनाथ निमगडे हत्येच्या तपासात काय प्रगती झाली?

Next

नागपूर : संपूर्ण शहराला हादरविणाऱ्या व सुरक्षाव्यवस्थेबाबत चिंता करायला भाग पाडणाऱ्या आर्किटेक्ट एकनाथ निमगडे हत्येच्या तपासात आतापर्यंत काय प्रगती झाली, अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी ‘सीबीआय’ला केली व यावर ६ मेपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले.

यासंदर्भात अनुपम निमगडे यांनी याचिका दाखल केली आहे. त्यावर न्यायमूर्तीद्वय झेड. ए. हक व अमित बोरकर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. एकनाथ निमगडे हे अनुपम निमगडे यांचे वडील होते. ही घटना ६ सप्टेंबर २०१६ रोजी सकाळी ८ च्या सुमारास सेंट्रल एव्हेन्यूवरील लाल इमली चौकात घडली होती. मॉर्निंग वॉक करून घरी परतत असताना निमगडे यांची बंदुकीच्या पाच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. दरम्यान, नागपूर पोलिसांना बरेच दिवस गुन्हेगारांचा शोध लागला नाही. त्यामुळे अनुपम यांनी त्यावेळीही उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. १७ ऑक्टोबर २०१६ रोजी उच्च न्यायालयाने ती याचिका निकाली काढताना या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे हस्तांतरित करण्याचा आदेश दिला होता. परंतु, सीबीआयच्या तपासामध्ये अद्याप ठोस प्रगती झाली नाही. ते या प्रकरणाचा प्रभावीपणे तपास करण्यात अपयशी ठरले आहेत, असे अनुपम यांचे म्हणणे आहे. परिणामी, त्यांनी दुसऱ्यांदा उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. उल्लेखनीय म्हणजे, एकनाथ निमगडे यांची हत्या करण्यासाठी कामठीतील कुख्यात रणजित सफेलकर याने पाच कोटी रुपयात सुपारी घेतली होती, असे नागपूर पोलिसांनी गेल्या मार्चमध्ये जाहीर केले आहे. सफेलकरला अटकही करण्यात आली आहे.

-----------

साडेपाच एकर जमिनीचा वाद

वर्धा मार्गावरील हॉटेल एअरपोर्ट सेंटर पॉईंटच्या मागे निमगडे यांच्या मालकीची साडेपाच एकर जमीन आहे. या जमिनीची किंमत सुमारे ५०० कोटी रुपये आहे. या जमिनीचा वाद न्यायालयात सुरू आहे. या वादातून निमगडे यांची हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे. या प्रकरणात एका नेत्यासह पाच जण संशयित आहेत, असे पोलिसांचे म्हणणे आहे.

Web Title: What progress has been made in the investigation of Eknath Nimgade murder?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.