कोरोना निर्बंधांबाबत भाजपची भूमिका तरी काय?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 11:16 AM2021-06-29T11:16:12+5:302021-06-29T11:17:15+5:30
Nagpur News कोरोना निर्बंधांबाबत एकाच पक्षातून वेगवेगळे सूर दिसून येत असल्याचे चित्र असून, भाजपची नेमकी भूमिका तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यभरात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएन्टचा प्रसार थांबविण्यासाठी निर्बंध लागू करण्यात आले आहेत. भाजपने मुंबईत या निर्बंधांवर जोरदार टीका केली आहे. मात्र उपराजधानीचे शहर असलेल्या नागपुरात याच निर्बंधांचा आधार घेत चक्क पाच जिल्हा परिषदांमधील पोटनिवडणुका रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोना निर्बंधांबाबत एकाच पक्षातून वेगवेगळे सूर दिसून येत असल्याचे चित्र असून, भाजपची नेमकी भूमिका तरी काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
ओबीसींवरील अन्याय टाळण्यासाठी तसेच कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता, या पोटनिवडणुका रद्द करण्यात याव्या, अशी मागणी भाजपने राज्य निवडणूक आयोगाकडे केली आहे. यासंदर्भात भाजपचे प्रदेश सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे व जिल्हाध्यक्ष अरविंद गजभिये यांनी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांकडे निवेदन पाठविले आहे. ओबीसींवर होत असलेल्या अन्यायासह भाजप नेत्यांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा मुद्दा उपस्थित केला. निवडणूक प्रक्रियेच्या काळात प्रचारामुळे लोकांचा एकमेकांशी संपर्क येणे स्वाभाविक आहे व फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे अशक्य आहे. निवडणुकीमुळे कोरोनाची साथ पुन्हा राज्यभर पसरण्याचा धोका आहे. त्यामुळे निवडणुका घेण्यात येऊ नये, अशी मागणी भाजपतर्फे करण्यात आली.
परंतु मुंबईत मुख्य पक्ष प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी निर्बंधांवरूनच राज्य शासनावर टीकास्त्र सोडले आहे. सरकारकडून कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची दहशत पसरवत सामाजिक आणीबाणी लागू करण्याचा प्रयत्न होत आहे. तिसऱ्या लाटेची भीती दाखवून जनतेचा असंतोष दडपण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून चालू आहे, असे उपाध्ये यांनी म्हटले आहे. नागपुरात कोरोनाचा प्रसार टाळण्यासाठी लोकांचा एकमेकांशी संपर्क यायला नको अशी एक भूमिका व मुंबईत निर्बंधांविरोधातील वक्तव्य यावरून भाजपच्या एकूण भूमिकेवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत.