'व्हॉट सांता डज ऑल इयर राऊंड', बच्चे कंपनीसाठी एक वाचन पर्वणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2020 07:10 AM2020-12-25T07:10:05+5:302020-12-25T07:10:36+5:30
What Santa Does All Year Round : अंजली यांना दोन मुले आहेत आणि म्हणूनच एका आईच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहिल्याचे स्पष्ट होते. कविता आणि काव्यात्मक शब्दचातुर्यातून त्यांनी वर्षातील प्रत्येक महिन्यांचे वर्णन केले आहे.
- मेहा शर्मा
नागपूर : लहान मुले असो वा त्यांचे पालक, दोघांसाठीही अंजली पिरामल लिखित ‘व्हॉट सांता डज ऑल इयर राऊंड’ अर्थात ‘सांता वर्षभर काय करतो’ हे पुस्तक एक वाचन पर्वणी आहे. खरेच वर्षभर सांता काय करीत असेल, हा जवळपास प्रत्येकच मुलाच्या मनावर अंकित झालेला प्रश्न आहे. यातील सांता लॅण्डची रंगवण्यात आलेली सुरेख चित्रे, मुलांच्या कल्पनाशक्तीला वृद्धिंगत करण्यास सक्षम आहेत. ही चित्रे आशना रॉय यांनी साकारलेली आहेत. मुलांच्या परिकल्पनेला आधारभूत ही चित्रे लक्षवेधी आहेत. ही चित्रे मुलांना आकर्षित करतातच आणि सांताच्या वर्षभरातील चुळबुळ्या कृत्यांच्या आभासी जगात रममाण करतात.
अंजली यांना दोन मुले आहेत आणि म्हणूनच एका आईच्या दृष्टिकोनातून हे पुस्तक लिहिल्याचे स्पष्ट होते. कविता आणि काव्यात्मक शब्दचातुर्यातून त्यांनी वर्षातील प्रत्येक महिन्यांचे वर्णन केले आहे. हे वर्णन केवळ काल्पनिक नसून, त्यातून मुलांना प्रत्येक ऋतूंची माहितीही मनोरंजक पद्धतीने मिळते. पुस्तकात सांता, त्याचे कुटुंब, त्याचे निवासस्थान आणि त्याच्या खेळण्यांच्या कार्यशाळेचे विस्तृत वर्णन आहे. हे पुस्तक मुलांना सांता जगताच्या प्रवासात घेऊन जाण्यास सक्षम आहे. हे पुस्तक मुलांसाठी एक नाताळ अर्थात ख्रिसमस भेट आहे आणि रात्रीच्या वेळी वाचनासाठी सर्वोत्तम आहे.
लेखिकेविषयी....
- अंजली यांना लिखाणाची प्रचंड आवड आहे. लहान असतानाच त्यांनी काही कवितांचे लेखन केले.
- अमेरिकेतील ओहायो येथील डेनिसन युनिव्हर्सिटीमध्ये क्रिएटिव्ह
रायटिंगमध्ये ग्रॅज्युएशन करीत असताना काही लघुकथांचेही लेखन केले.
- त्यानंतर त्यांनी न्यूयॉर्क युनिव्हर्सिटीमधून पत्रकारितेची पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.
- त्यांच्या मुलीने, ख्रिसमसपूर्वी सांता क्लॉज काय करतो, असा प्रश्न विचारला. या प्रश्नाचे अंजली यांना खरे तर आश्चर्य वाटले. मात्र, हाच प्रश्न पुढे या पुस्तकाच्या निर्मितीमागची प्रेरणा ठरला. खरेच वर्षभर सांता काय करतो, अशी कल्पना मनात रंगायला सुरुवात झाली आणि साकारले गेले ‘सांता वर्षभर काय करतो’ हे पुस्तक.