उद्योग गेल्याचे वडेट्टीवार यांना कुठल्या सुत्रांनी सांगितले
By कमलेश वानखेडे | Published: September 19, 2024 04:55 PM2024-09-19T16:55:02+5:302024-09-19T16:56:04+5:30
उद्योगमंत्री उदय सामंत यांचा टोला : विभागाकडे अशी कुठलिही नोंद नाही
नागपूर : विदर्भात किती उद्योग आले याकडे कदाचित विरोधी पक्षनेते वडेट्टीवार यांचे लक्ष नसावे. पूर्व आणि पश्चिम विदर्भात अनेक प्रकल्प, उद्योगांना आणण्यात सरकार यशस्वी झालेले आहे. कुठल्या सुत्रांनी त्यांना उद्योग गेल्याची माहिती दिली, असा सवाल करीत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी वडेट्टीवार यांना टोला लगावला. उद्योग मंत्री म्हणून आपल्याकडे अशी कुठेही नोंद नाही. प्रधान सचिव यांच्याकडून माहिती घेण्यासाठी सूचना दिल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
गुरुवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना उद्योगमंत्री सामंत म्हणाले, देशातील पहिला सेमीकंडक्टर उद्योगाचे उद्घाटन मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत झाले. परकीय गुंतवणुकीमध्ये मागील काळात मागे असलेला महाराष्ट्र सगळ्यांना मागे टाकून आता पुढे चाललेला आहे. महाराष्ट्र विदेशी गुंतवणुकीत एक नंबरवर आहे आणि राहील, असा दावा त्यांनी केला.
बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी संयम ठेवावा
बेताल वक्तव्य करणाऱ्यांनी संयम ठेवला पाहिजे. महायुती म्हणून निवडणुकीला समोर जाताना आपली मते कमी होणार नाही, प्रत्येक पक्षाच्या घटक पक्षाच्या सगळ्यांनी याची काळजी घेतली पाहिजे, असा सल्ला सामंत यांनी दिला.
तिकीट वाटप सन्मान जनक होईल
महायुतीतील तिकीट वाटप सन्मान जनक होईल. सन्मान जनकचा आकडा किती असेल यावर बोलणे मात्र उदय सामंत यांनी टाळले. तिसऱ्या आघाडीच्या शक्यतेबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, कुठली आघाडी झाली तरी महाविकास आघाडीचा पराभव अटळ आहे. दोन महिन्यानंतर मी जेव्हा नागपूरला येईल तेव्हा महायुतीचा सरकार सत्तेत आलेले असेल. सगळ्यांना स्वतंत्र निर्णय घेऊन आघाडी करण्याचे अधिकार आहे.
शरद पवारांचे एका दगडात तीन पक्षी...
मुख्यमंत्री कोण या विषयावर पंधरा दिवसापूर्वी शरद पवार महत्त्वाचे बोलले. त्यांनी एका दगडात तीन पक्षी मारलेले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भानावर यावे. संख्याबळ असल्यावरच मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवता येईल. निवडून आल्यानंतर कोण मुख्यमंत्री हे ठरवू, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.