डाव्यांविरोधात संघाची रणनीती काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 7, 2018 01:25 AM2018-03-07T01:25:08+5:302018-03-07T01:25:30+5:30
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला ९ मार्चपासून रेशीमबाग स्मृतिमंदिर परिसरात सुरुवात होत आहे. या बैठकीत समाविष्ट होणारे मुद्दे अंतिम झाले आहे. डाव्या विचारसरणीच्या पक्षांविरोधातील रणनीतीवर या सभेत चर्चा होण्याची शक्यता असून संघ परिवाराशी जुळलेल्या संस्थांमध्ये समन्वय वाढावा यावरदेखील मंथन होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान, देशाच्या विविध भागांतून संघ प्रचारक व ज्येष्ठ स्वयंसेवक रेशीमबागमध्ये येण्यास सुरुवात झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
त्रिपुरा येथील डाव्यांचा गड ढासळल्यानंतर संघ परिवारात उत्साहाचे वातावरण आहे. केरळमधील हिंसेविरोधात संघाने मागीलवर्षी उघडपणे आवाज उठविला व रस्त्यांवर येऊन निदर्शने केली. या पार्श्वभूमीवर अ.भा.प्रतिनिधी सभेत नक्कीच याचे प्रतिबिंब उमटेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. संघात दर तीन वर्षांनी संघटनात्मक निवडणुका होतात. यंदा होणाºया अखिल भारतीय सभेत संघाच्या कारभाराची धुरा सांभाळणाºया सरकार्यवाह या पदाची निवड होणार आहे. देशभरातून निवडण्यात आलेले अखिल भारतीय प्रतिनिधी या निवड प्रक्रियेत सहभागी होतील. वर्तमान सरकार्यवाह भय्याजी जोशी यांचे वय सत्तरीपार झाले आहे. त्यामुळे तेच सरकार्यवाहपदी कायम राहतील की नाही याबाबत संघ वर्तुळातदेखील साशंकता आहे. सहसरकार्यवाह डॉ.कृष्णगोपाल, दत्तात्रेय होसबळे व व्ही.भागय्या यांच्यापैकी एकाकडे ही जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भातील अंतिम निर्णय प्रतिनिधी सभेतच होणार आहे.
या सभेत रिक्त जागादेखील भरण्यात येतील, तसेच संघटनविषयक बाबींसह सामाजिकदृष्ट्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा केली जाणार आहे. संघाचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रांचा विकास करण्यासाठी उपाययोजनांसंदर्भात या सभेत चर्चा होण्याची शक्यता आहे. अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत भारतीय किसान संघ, वनवासी कल्याण आश्रम, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, भारतीय मजदूर संघ, विश्व हिंदू परिषद, भारतीय जनता पक्ष यांच्यासह संघ परिवारातील ३५ संघटनांचे १,४०० प्रतिनिधी सहभागी होणार आहेत. सभेत मांडण्यात येणाºया प्रस्तावांवर त्यांच्या उपस्थितीत चर्चा होईल. याचप्रमाणे विविघ संघटनांचे प्रतिनिधी त्यांच्या कामाचा लेखाजोगा संक्षिप्तपणे मांडतील.