बस भाडेतत्वावर घेताय मग कार्यशाळेचा उपयोग काय ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2021 04:06 AM2021-06-22T04:06:34+5:302021-06-22T04:06:34+5:30
स्वत:च्या कार्यशाळा असूनही दयानंद पाईकराव नागपूर : एसटी महामंडळाच्या महाराष्ट्रात तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. तेथे बस बांधणीचे काम करण्यात ...
स्वत:च्या कार्यशाळा असूनही
दयानंद पाईकराव
नागपूर : एसटी महामंडळाच्या महाराष्ट्रात तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. तेथे बस बांधणीचे काम करण्यात येते. या कार्यशाळेत बस बांधण्याऐवजी महामंडळाने ५०० बस भाडे तत्त्वावर घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यामुळे मग एसटीच्या कार्यशाळेचा उपयोग काय, असा प्रश्न उपिस्थत झाला आहे. या निर्णयामुळे आधीच आर्थिक संकटाचा सामना करीत असलेले एसटी महामंडळ आणखीनच संकटात सापडणार असल्याचे मत एसटीतील जाणकार व्यक्त करीत आहेत. त्यामुळे एसटीने हा निर्णय रद्द करून आपल्याच कार्यशाळेत कमी खर्चात बसेसची बांधणी करण्याची मागणी होत आहे.
एसटी महामंडळाच्या महाराष्ट्रात तीन मध्यवर्ती कार्यशाळा आहेत. यात औरंगाबादमधील चिकलठाणा, पुणे येथील दापोडी आणि नागपुरात हिंगणा येथील कार्यशाळेचा समावेश आहे. या कार्यशाळा आशिया खंडातील सर्वात मोठ्या कार्यशाळा आहेत. येथे बस बांधणीचे काम उत्तम पद्धतीने करण्यात येते. आपल्याच कार्यशाळेत बस बांधणी करता येत असतानाही एसटी महामंडळाने ५०० लालपरी भाडेतत्त्वावर घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्यासाठी विभागीय कार्यालयांना पत्र देऊन भाडेतत्त्वावरील बसेसच्या देखभालीसाठी जागेची व्यवस्था करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामुळे एसटीतील संघटनांनी एसटी महामंडळाच्या या निर्णयाला कडाडून विरोध दर्शविला आहे. भाडेतत्त्वावर लालपरी घेतल्यास एसटी महामंडळ आणखीनच आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता असल्याचे एसटीतील जाणकारांचे मत आहे. एसटीच्या तीनही कार्यशाळेत कमी खर्चात बस बांधणी होते. असे असताना आतापर्यंत एसटी महामंडळ बाहेरून बस बांधून घेत होते. २०१६ पासून तीनही कार्यशाळेत एकही नवे चेसीस खरेदी करण्यात आलेले नाही. बसला ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर बसची बॉडी काढून जुन्याच चेसीसवर नवी बॉडी चढविण्यात येते. आर्थिक बचत करण्यासाठी एसटी महामंडळाने भाडेतत्त्वावर लालपरी घेण्याचा निर्णय मागे घेऊन आपल्याच कार्यशाळेत बसेसची बांधणी करण्याची मागणी एसटीतील कामगार संघटना आणि कर्मचारी करीत आहेत.
..............
बस बांधणीची आकडेवारी
३,४०० मिलीमीटर उंचीची बस ११.५० लाख
३,२०० मिलीमीटर उंचीची बस १० लाख
बस बांधणीसाठी लागणारा वेळ : १,१७६ तास
इंदिरा गांधींनी केले होते कौतुक
१९८२ साली दिल्ली येथे झालेल्या आशियाई क्रीडांसाठी एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेतून बस पाठविण्यात आल्या होत्या. पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी या बसेसचे कौतुक करून एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेच्या कार्याची स्तुती केली होती.
सीट, खिडक्याही घेतात विकत
एसटी बसला लागणाऱ्या सीट, खिडक्या या कमी खर्चात एसटीच्या मध्यवर्ती कार्यशाळेत तयार होऊ शकतात. परंतु एसटी महामंडळ सीट आणि खिडक्या खरेदी करण्यासाठी निविदा काढून खासगी कंपनीकडून त्या खरेदी करीत आहे. एसटीच्या कार्यशाळेत सीट आणि खिडक्या तयार केल्यास एसटीचा खर्च कमी होऊ शकतो, अशी भावनाही एसटीचे कर्मचारी व्यक्त करीत आहेत.
भाडेतत्त्वावर लालपरी घेण्याचा निर्णय रद्द करावा
‘एसटीच्या आशिया खंडातील सर्वात मोठ्या तीन कार्यशाळा एसटीच्या मालकीच्या आहेत. असे असूनही आपल्या कार्यशाळेत बस बांधणी करावयाचे सोडून एसटी महामंडळ लालपरी भाडेतत्त्वावर घेण्याच्या हालचाली करीत आहे. त्यामुळे भाडेतत्त्वावर लालपरी घेण्याचा निर्णय रद्द करून एसटीच्या कार्यशाळेत बसेसची बांधणी करून आर्थिक बचत करण्याची गरज आहे.’
- संदीप शिंदे, अध्यक्ष, एसटी कामगार संघटना, मुंबई
..........