मध्यरात्रीनंतर ‘तो’ बोगस डॉक्टर मेडिकलमध्ये काय करीत होता ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 07:25 PM2018-05-18T19:25:39+5:302018-05-18T19:26:15+5:30
मेडिकलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना स्वत: डॉक्टर असल्याचे सांगून त्यांची दिशाभूल करून आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरला गुरुवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) जवानांनी पकडले. या पूर्वीही या बोगस डॉक्टरला अंगात अॅप्रॉन व गळ्यात स्टेथेस्कोप टाकून कमी दरात औषधे व रक्त आणून देतो असे सांगून नातेवाईकांना गंडविताना रक्षकांनी पकडून अजनी पालिसांच्या स्वाधीन केले होते. परंतु चार महिन्यातच पुन्हा तीच व्यक्ती समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मेडिकलमधील रुग्णांच्या नातेवाईकांना स्वत: डॉक्टर असल्याचे सांगून त्यांची दिशाभूल करून आर्थिक लुबाडणूक करणाऱ्या बोगस डॉक्टरला गुरुवारी रात्री १.३० वाजताच्या सुमारास महाराष्ट्र सुरक्षा बलाच्या (एमएसएफ) जवानांनी पकडले. या पूर्वीही या बोगस डॉक्टरला अंगात अॅप्रॉन व गळ्यात स्टेथेस्कोप टाकून कमी दरात औषधे व रक्त आणून देतो असे सांगून नातेवाईकांना गंडविताना रक्षकांनी पकडून अजनी पालिसांच्या स्वाधीन केले होते. परंतु चार महिन्यातच पुन्हा तीच व्यक्ती समोर आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
प्रकाश प्रल्हाद वानखेडे (४०) असे त्या बोगस डॉक्टरचे नाव आहे.
प्राप्त माहितीनुसार, १५ दिवसांपूर्वी एका महिलेने एका डॉक्टरवर संशय व्यक्त करून तो रुग्णांसोबत असलेल्या महिलांची दिशाभूल करून मानसिक, शारीरिक व आर्थिक लुबाडणूक करीत असल्याची तक्रार ‘एमएसएफ’ कडे केली होती. या तक्रारीला घेऊन मेडिकलच्या सुरक्षा रक्षकांना अलर्ट करण्यात आले होते. १७ मे रोजी रात्री १.३० वाजताच्या सुमारास मेडिकलच्या वॉर्ड क्र. ३१ समोर एक तरुण संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे सुरक्षा रक्षकांना सीसीटीव्ही कॅमेºयामध्ये दिसून आले. रक्षकांनी मोठ्या शिताफीने त्याला पकडले असता धक्काच बसला. तीन-चार महिन्यांपूर्वी हाच तरुण अॅप्रॉन घातलेला, गळ्यात स्टेथेस्कोप ठेवून स्वत:ला डॉक्टर म्हणून मिरवत होता. त्याने कमी दरात औषधे व रक्त उपलब्ध करून देतो असे सांगून एका महिलेकडून पाच हजार रुपये घेतले होते. सुरक्षा रक्षकांनी त्याला पकडून अजनी पोलिसांच्या हवाली केले होते. परंतु आता पुन्हा तोच तरुण लबाडणूक करीत असल्याचे आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. सुत्रानूसार, यावेळी पकडलेल्या बोगस डॉक्टरवर कठोर कारवाई होण्यासाठी सुरक्षा रक्षकांनी लेखी तक्रार अजनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. ही कारवाई एमएसएफचे वरिष्ठ अधिकारी व सुपरवायझर सनी खरे, अंकुश खानझोडे, ज्ञानेश्वर कुलमथे, गोपीचंद नानवटकर व परमेश्वर डोंगरे यांनी केली.