हॉटेल्स व रेस्टॉरंट बंद करून काय साध्य होणार; संचालकांचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 11:40 AM2021-06-30T11:40:40+5:302021-06-30T11:41:06+5:30
Nagpur News राज्य शासनाने संपूर्ण राज्याला लेव्हल-३ मध्ये टाकून त्यानुसार सोई-सुविधा दिल्या आहेत. त्याअंतर्गत हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ५० टक्के क्षमता आणि दुपारी ४ वाजता बंद करायचे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्य शासनाने आठवड्यापूर्वी पाचस्तरीय धोरण घोषित करताना नागपूर जिल्ह्याला पहिल्या स्तरात टाकून त्याअंतर्गत येणाऱ्या सोई-सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. त्यामुळे हॉटेल्स व रेस्टॉरंट रात्री ११ पर्यंत सुरू होते. पण आता कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तविल्याने राज्य शासनाने संपूर्ण राज्याला लेव्हल-३ मध्ये टाकून त्यानुसार सोई-सुविधा दिल्या आहेत. त्याअंतर्गत हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये ५० टक्के क्षमता आणि दुपारी ४ वाजता बंद करायचे आहे. दीड वर्षांपासून आर्थिक नुकसान सोसावे लागत असलेल्या हॉटेल्स व रेस्टॉरंट संचालकांच्या नुकसानीत आणखी भर पडणार आहे. हॉटेल्स व रेस्टॉरंट बंद करून काय साध्य होणार, असा संचालकांचा सवाल आहे.
नागपूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात घसरण झाली आहे. याशिवाय मृत्यूवर नियंत्रण आले आहे. प्रशासनाने निर्बंध हटविल्याने विविध बाजारपेठांमध्ये ग्राहकांची गर्दी होऊ लागली आहे. ही गर्दी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला आमंत्रण देत तर नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे. संचालक म्हणाले, कोरोना निर्बंधामुळे राज्याच्या अन्य भागातील, शासकीय, कॉर्पोरेट आणि कंपन्याचे अधिकारी तसेच अन्य राज्यातील लोक नागपुरात येत नसल्याने नागपुरातील ९० टक्क्यांपेक्षा जास्त हॉटेल्स व लॉज केवळ २० टक्के क्षमतेने सुरू आहेत. त्यातच आता ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचे निर्बंध टाकल्याने हॉटेल्समध्ये प्रवासी आणि रेस्टॉरंटमध्ये ग्राहक येणारच नाही. रेस्टॉरंटचा व्यवसाय रात्री ८ नंतरच असल्याने ग्राहक घराबाहेर निघण्याचा प्रश्नच नाही. त्यामुळे हॉटेल्स व रेस्टॉरंट संचालकांच्या आर्थिक नुकसानीत आणखी भर पडली आहे. त्यामुळे बँकांचे कर्ज व व्याजाचा बोझा वाढला आहे. गुजरात सरकारप्रमाणे महाराष्ट्र सरकारनेही प्रॉपर्टी टॅक्स आणि वीज अधिभारात सूट द्यावी, असे संचालकांचे मत आहे.
हॉटेल व्यवसाय पुन्हा कधी उभा राहणार?
राज्य शासन आणि स्थानिक प्रशासनाने हॉटेल्स व रेस्टॉरंटवर निर्बंध टाकल्याने संचालक अचंबित झाले आहेत. या आर्थिक नुकसानीतून बाहेर कसे पडावे, यावर ते चिंतेत आहेत. या व्यवसायासाठी दुपारी ४ पर्यंत वेळ सोईस्कर नाहीच. व्यवसाय होत नसल्याने कर्मचाऱ्यांना पगार कसा द्यायचा, हासुद्धा गंभीर प्रश्न आहे.
तेजिंदरसिंग रेणू, हॉटेल व्यावसायिक.
हॉटेल व रेस्टॉरंट व्यवसाय कर्मचाऱ्यांवर अवलंबून असतो. उत्पन्न होत नसल्याने कर्मचारी ठेवून उपयोग नाही. ही स्थिती दीड वर्षांपासून आहे. पूर्वी व्यवसाय बंद असल्याने कर्मचाऱ्यांना काही महिने पूर्ण तर काही महिने अर्धे वेतन दिले. यावर्षीही कोरोनामुळे नुकसान सोसावे लागत आहे. कमी वेतनामुळे कर्मचारीही सोडून जात आहेत.
वसंत गुप्ता, हॉटेल व्यावसायिक.
हॉटेल कर्मचाऱ्यांचे तर आणखी हाल :
गेल्यावर्षी हॉटेल सहा महिने बंद असताना मालकाने अर्धा पगार दिला. त्यानंतर पूर्णवेळ पगार सुरू झाला. पण आता हॉटेलमध्ये ग्राहक नसल्याने मालकाने बऱ्याच कर्मचाऱ्यांना कमी केले आहे. सध्या अर्धा पगार सुरू आहे. त्यामुळे कुटुंबांचा खर्च चालविणे कठीण झाले आहे.
सदानंद उइके, हॉटेल कर्मचारी.
गेल्या दीड वर्षांपासून कोरोनामुळे कुटुंबाचे हाल होत आहे. गेल्यावर्षी चार महिने नोकरी नव्हती. यावर्षी नोकरी मिळाली आणि वेतन सुरू झाले. पण आता निर्बंधामुळे अर्धे वेतन मिळत आहे. या वेतनात कुटुंबाचा आणि मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलले कठीण झाले आहे.
प्रणय देवळे, हॉटेल कर्मचारी.
- हॉटेल्स सोमवार ते शुक्रवारपर्यंत दुपारी ४ पर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहणार असल्याने संचालकांना आर्थिक नुकसान आणि बँकांचे कर्ज व व्याजाचा बोझा वाढणार आहे.
- हॉटेल्स पूर्णवेळ सुरू राहणार नसल्याने कर्मचाऱ्यांचे वेतन, हॉटेल्सची देखभाल, वीजबिल, इतर खर्च आदींची समस्या निर्माण झाली आहे.
- गेल्यावर्षी केंद्र सरकारच्या लॉकडाऊननंतर खर्च परवडत नसल्याच्या कारणाने अनेकांनी हॉटेल्स सुरू केले नाहीत. वारंवार निर्बंधामुळे व्यावसायिकांचे कंबरडे मोडले आहे.