दहावीच्या दाखल्यावर शेरा काय असणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:06 AM2021-07-24T04:06:40+5:302021-07-24T04:06:40+5:30
नागपूर : दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देताना त्यावर शाळा सोडल्याची तारीख तसेच शेरा काय लिहायचा, असा प्रश्न ...
नागपूर : दहावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना शाळा सोडल्याचा दाखला देताना त्यावर शाळा सोडल्याची तारीख तसेच शेरा काय लिहायचा, असा प्रश्न निर्माण झाल्याने काही जिल्ह्यातील मुख्याध्यापक संभ्रमात पडले आहेत.
कोरोना संकटामुळे गेल्यावर्षात शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत. दहावी व बारावी परीक्षाही झाल्या नाहीत. त्यामुळे राज्य शिक्षण मंडळाने नववीच्या निकालाच्या आधारे व दहावीच्या अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना गुणदान करून दहावीचा निकाल जाहीर केला. दरवर्षी निकाल जून महिन्यात जाहीर होतो. परंतु यंदा जुलै महिना लोटला आहे. स्कूल कोड नुसार ३१ मे ची तारीख दाखल्यावर टाकण्याचा उल्लेख आहे. त्यामुळे आता शाळांच्या मुख्याध्यापकांसमोर नवीन पेच निर्माण झाला आहे. काही जिल्ह्यातील मुख्याध्यापक संघटनांनी यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांची भेट घेऊन, त्यावर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर शाळांकडून उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे दाखले तयार करण्याचे काम सुरू होते. परंतु विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर तारीख व शेरा काय लिहायचा, असा प्रश्न काही जिल्ह्यातील मुख्याध्यापकांना पडला आहे. त्यामुळे उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे दाखले तयार करण्याचे अजूनही काम सुरू होऊ शकले नाहीत. दाखला तयार करण्यासाठी शाळा सोडल्याची तारीख व शेरा याविषयी शिक्षण विभागाने लवकरात लवकर स्पष्ट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
दृष्टिक्षेपात
जिल्ह्यातील माध्यमिक शाळा -७५४
दहावीतील एकूण विद्यार्थी - ६२६४९
पास झालेले विद्यार्थी - ६२२००
- विषय फार गंभीर नाही, कोरोनामुळे यावर्षी शाळाच सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे शाळांनीच दाखला देताना शाळा सोडल्याची काय तारीख टाकावी हे मुख्याध्यापकांनी ठरवावे. आम्ही गेल्यावर्षी विद्यार्थ्यांची टीसी देताना जी तारीख टाकली होती तीच तारीख यंदा टीसीवर टाकणार. कारण यावर्षी शाळा भरल्या नाही, परीक्षा झाल्या नाही.
प्रदीप बिबटे, प्राचार्य
- निकाल दिल्याची तारीख टाकता येईल
यावर्षी शाळा भरली नाही, परीक्षा झाल्या नाहीत, त्यामुळे काही मुख्याध्यापकांना दाखल्यावर शाळा सोडल्याची तारीख काय टाकावी, असा प्रश्न पडला आहे. त्यासंदर्भात वरून काहीही निर्देश आलेले नाही. शाळांना निकाल मिळाला त्यादिवशीची तारीख टाकता येईल, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.