रामटेकच्या पुढे रेल्वे जाणार काय?
By Admin | Published: December 30, 2014 12:54 AM2014-12-30T00:54:58+5:302014-12-30T00:54:58+5:30
कोळसा, मॅगनिज, डोलामाईट यासारख्या खनिजाची वाहतूक करण्यासाठी इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात नागपूर - रामटेक रेल्वे सुरू केली. मात्र स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही ही रेल्वे लाईन पुढे गेली नाही.
दीपक गिरधर - रामटेक
कोळसा, मॅगनिज, डोलामाईट यासारख्या खनिजाची वाहतूक करण्यासाठी इंग्रजांनी स्वातंत्र्यपूर्व काळात नागपूर - रामटेक रेल्वे सुरू केली. मात्र स्वातंत्र्याच्या ६७ वर्षांनंतरही ही रेल्वे लाईन पुढे गेली नाही. परिणामी रामटेकचा पर्यटनाच्या बाबतीत पाहिजे तसा विकास होऊ शकला नाही. केवळ १५ किमी तारसापर्यंत रेल्वेरुळ जोडल्यास रामटेकला महत्त्व मिळू शकते. परंतु राजकीय इच्छाशक्तीच्या अभावाने विस्तारीकरण झाले नाही.
रामटेक परिसर हा खनिज संपदेने आणि निसर्ग सौंदर्याने समृद्ध असा आहे. या तालुक्यातील मनसर आणि नगरधन भागात मॅगनिजच्या खाणी आहेत. कन्हान, गोंडेगाव या भागात विपूल प्रमाणात दगडी कोळसा आहे. देवलापारच्या जंगली भागात मोठ्या प्रमाणात डोलामाईट आणि बॉक्साईट आढळते. या खनिज संपदेवर डोळा ठेवून स्वातंत्र्यपूर्व काळात इंग्रजांनी नागपूर-रामटेक रेल्वे सुरू केली. रामटेकच्या निसर्ग सौंदर्यावर इंग्रज अधिकारी जाम खूश होते. त्यामुळेच सुटीचा काळ ते रामटेक आणि शेजारच्या जंगली भागात येऊन घालवायचे, असा इतिहास सापडतो. त्यासाठी ते रेल्वेचा वापर करायचे. त्याकाळी इंग्रजांसाठी रेल्वेची कदाचित तेवढीच उपयुक्तता असेल. अलीकडे रामटेक हे पर्यटनाच्या नकाशावर आलेले राज्यातील प्रमुख ठिकाण आहे. येथील निसर्ग सगळ्यांनाच भुरळ घालतो. धार्मिक, सांस्कृतिक, इको-टुरिझम अशा सर्वच प्रकारचे पर्यटन एकाच ठिकाणी मिळेल असे रामटेक हे देशातील एकमेव केंद्र आहे. देश - विदेशातील पर्यटक म्हणूनच रामटेककडे आकर्षित होतात.
रामटेकजवळील मनसरच्या उत्खननाबाबत इंग्लंडमधील हंस बेकर या उत्खनन तज्ज्ञाने अहवाल सादर केला आहे. महाकवी कालिदासांनी रामगिरीवर ‘मेघदूत’ हे अजरामर काव्य लिहिले. त्यामुळे राज्यातील मुख्य अशी साहित्यभूमीसुद्धा आहे. इतकी वैशिष्ट्ये एकाच ठिकाणी असणारे रामटेक हे म्हणूनच विरळे आहे.
पर्यटकांना रामटेकला येणे सोयीचे व्हावे यासाठी रेल्वे मार्गाचे विस्तारीकरण होणे गरजेचे आहे. रामटेक रेल्वेचे विस्तारीकरण झाल्यास मुंबईपासून कोलकात्यापर्यंतची वाहतूक रामटेकमार्गे वळविली जाऊ शकते. यासाठी रामटेकपासून केवळ १५ किमी अंतरावर असलेल्या तारसापर्यंत रेल्वे टॅ्रक टाकावा लागणार आहे. रामटेक आणि परिसराची ही गेल्या अनेक वर्षांची मागणी आहे. रामटेकच्या विस्तारीकरणाबाबत गोटेगावपर्यंत सर्व्हेक्षण करण्याचे आदेश देण्यात आले होते. परंतु सर्वेक्षण झालेच नाही. मुकुल वासनिक रामटेकचे खासदार असताना या विस्तारीकरणाच्या चर्चांना वेग आला होता. त्या चर्चाही आता शांत झाल्या. रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांनी अद्याप तरी रामटेकसाठी काहीही केले नाही. विरोधाच्या लाटेवर स्वार होऊन ते लोकसभेत पोहोचले, म्हणून त्यांनी काहीच करू नये असे नाही. रामटेक रेल्वेच्या विस्तारीकरणाचा आवाज त्यांनी बुलंद करणे आवश्यक आहे. कर्मधर्म संयोगाने रेल्वेमंत्री सुरेश प्रभू हे महाराष्ट्राचेच असल्याने निश्चित या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद मिळू शकतो. आर. डी. मल्लिकार्जुन रेड्डी यांनीदेखील रामटेक रेल्वे विस्तारीकरणाचा प्रश्न उचलून धरावा, अशी इथल्या नागरिकांची अपेक्षा आहे.