‘माफसू’च्या परीक्षांचे काय होणार? विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2020 09:08 AM2020-05-18T09:08:54+5:302020-05-18T09:09:17+5:30
राज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र ‘माफसू’च्या (महाराष्ट्र अॅनिमल अॅन्ड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी) परीक्षांबाबत विद्यापीठ प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही.
योगेश पांडे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : ‘कोरोना’मुळे देशभरात ‘लॉकडाऊन’ घोषित झाला असताना शैक्षणिक क्षेत्रात अनिश्चिततेचे वातावरण आहे. राज्यातील सर्वच अकृषी विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. मात्र ‘माफसू’च्या (महाराष्ट्र अॅनिमल अॅन्ड फिशरीज सायन्स युनिव्हर्सिटी) परीक्षांबाबत विद्यापीठ प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतलेला नाही. पुढील महिन्यापासून परीक्षा सुरू होणार असल्या तरी अद्याप त्या पुढे ढकलण्यात येणार की नाही याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा न झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
‘लॉकडाऊन’च्या कालावधीत कुठल्याही परीक्षा घेण्यात येऊ नये असे राज्य शासनाचे निर्देश असल्याने अकृषी विद्यापीठांनी परीक्षा पुढे ढकलल्या. आता केवळ अंतिम वर्षाच्या परीक्षा होणार की नाही याबाबत जून महिन्यात आढावा घेण्यात येईल. परंतु ‘माफसू’च्या सत्र व वार्षिक परीक्षाच मुळात जून महिन्यात सुरू होतात. सर्वसाधारणत: ‘डेअरी टेक्नॉलॉजी’, ‘फिशरी सायन्स’च्या सत्र प्रणाली व ‘व्हेटरनरी सायन्स’च्या वार्षिक प्रणालीच्या परीक्षा जून ते ऑगस्ट या कालावधीत चालतात. महाराष्ट्रात ३१ मेपर्यंत ‘लॉकडाऊन’ वाढविण्यात आला आहे. जर त्यानंतर ‘लॉकडाऊन’ संपला तरी विद्यार्थ्यांना गावांहून परत यायला व इतर प्रशासकीय प्रक्रियेसाठी वेळ लागेल. त्यामुळेच जूनपासून सुरू होणाऱ्या परीक्षा कशा होणार असा प्रश्न विद्यार्थ्यांकडून विचारण्यात येत आहे. यासंदर्भात विद्यापीठ प्रशासनाने कुठलेही धोरण स्पष्ट केलेले नाही. वार्षिक परीक्षेविषयी कसल्याही प्रकारचे सूचनापत्र प्रकाशित केलेले नाही व संकेतस्थळावरदेखील कसलीही माहिती नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या संभ्रमात आणखी वाढ झाली आहे.
‘ऑनलाईन’ परीक्षा शक्य नाही
यासंदर्भात अद्याप निर्णय का झाला नाही याबाबत विविध पशुवैद्यकीय महाविद्यालयांकडून विद्यापीठाला विचारणा होत आहे. ‘ऑनलाईन’ परीक्षांबाबत विद्यापीठाने विचार करु नये, अशी अनेकांची भूमिका आहे. बहुतांश विद्यार्थी हे ग्रामीण भागातील आहेत. त्यामुळे ‘ऑनलाईन’ सुविधा उपलब्ध होतील की नाही हा प्रश्नच आहे. शिवाय तीनही विद्याशाखांमध्ये प्रात्यक्षिकांनादेखील महत्त्व आहे. त्यामुळे ‘ऑनलाईन’ परीक्षा घेणे शक्य नाही अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर दिली.
अंतिम निर्णयासाठी प्रतीक्षाच
‘माफसू’मधील अभ्यासक्रम हे भारतीय कृषी संशोधन परिषद व भारतीय पशुवैद्यक परिषदेच्या किमान मापदंडांवर आधारित आहे. त्यांच्या नियमांच्या बाहेर जाता येत नाही. परीक्षा प्रणालीत बदल झाला तर विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय पातळीवर नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विद्यार्थी हित समोर ठेवून पुढे काय पावले उचलायचे याबाबत विद्वत् परिषदेत मंथन करण्यात येईल. त्यानंतरच परीक्षांबाबत निर्णय घेण्यात येईल, असे पशुवैद्यकीयशास्त्र अधिष्ठाता व ‘डायरेक्टर आॅफ इन्स्ट्रक्शन्स’ डॉ.ए.पी.सोमकुंवर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे एकूणच परीक्षांबाबत निर्णय व्हायला काही दिवस निश्चितच लागतील असे चित्र आहे.