‘आप’ का क्या होगा?
By admin | Published: July 26, 2014 02:56 AM2014-07-26T02:56:34+5:302014-07-26T02:56:34+5:30
लोकसभा निवडणुकांत संपूर्ण देशात ताकदीनिशी
कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग : सुरुवातच चुकीची झाल्याची भावना
नागपूर : लोकसभा निवडणुकांत संपूर्ण देशात ताकदीनिशी उतरणाऱ्या ‘आप’ने (आम आदमी पार्टी) महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका न लढण्याचे संकेत दिले आहेत. यासंदर्भात शुक्रवारी सायंकाळपर्यंत अधिकृत घोषणा झाली नव्हती. परंतु सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीमुळे उपराजधानीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा अपेक्षाभंग झाला आहे. ‘आप’ची सुरुवातच चुकीच्या ‘ट्रॅक’वर झाल्याची भावना कार्यकर्त्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
उपराजधानीत लोकसभा निवडणुकांच्या काळात ‘आप’ने चांगलीच वातावरण निर्मिती केली होती. अंजली दमानियांना ‘आऊटसोर्स’ करून उपराजधानीत उमेदवारी देण्यात आली होती व येथील लढतीकडे देशाचे लक्ष लागले होते. परंतु लोकसभेच्या निकालानंतर ‘आप’ला अक्षरश: भगदाड पडले व अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकला. परंतु सुरुवातीपासून ‘आप’सोबत एकनिष्ठ राहिलेल्या कार्यकर्त्यांना विधानसभा निवडणुकांचे वेध लागले होते. काही जणांनी आपापल्या पातळीवर तयारीदेखील सुरू केली होती. परंतु हरियाणा येथे पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक न लढण्याबद्दलचा निर्णय जवळपास अंतिम होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. संबंधित वृत्त उपराजधानीतील कार्यकर्त्यांपर्यंतदेखील पोहोचले अन् अनेक जणांचा अपेक्षाभंग झाला.
‘आप’चे संयोजक देवेंद्र वानखडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी अद्याप ठोस सूचना आल्या नसल्याचे स्पष्ट केले. परंतु निवडणुका लढणार नाही असे संकेत मिळाले असल्याचे मात्र त्यांनी मान्य केले. पक्षाने स्थानिक पातळीवरील निवडणुकांपासून सुरुवात करायला हवी होती. यंदा जरी निवडणुका लढल्या नाहीत तरी संघटन बांधणीचे काम करण्यावर जास्त भर देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
‘ट्रॅक’च चुकला
यासंदर्भात ‘आप’च्या कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्या असता बहुतांश कार्यकर्त्यांनी पक्षाचा ‘ट्रॅक’च चुकला असल्याचे मत व्यक्त केले. नवीन पक्षाने सुरुवातीला संघटन बांधणीवर जास्तीत जास्त भर देण्याची गरज असते. परंतु ‘आप’ने स्थानिक स्तरांवरील निवडणुका न लढता थेट लोकसभेसारख्या मोठ्या निवडणुकांत उडी घेतली. केजरीवाल लाटेमुळे कार्यकर्त्यांमध्येदेखील उत्साह होता, परंतु तो तेवढ्या काळापुरता मर्यादित होता. निवडणुकांनंतर आता पक्षाचे संघटनच कोसळले आहे, असे कार्यकर्ते म्हणाले.