सरसंघचालक काय बोलणार? संघाच्या विजयादशमी उत्सवाकडे राजकीय पक्षांचेही लक्ष; शंकर महादेवन प्रमुख अतिथी
By योगेश पांडे | Published: October 23, 2023 01:47 PM2023-10-23T13:47:23+5:302023-10-23T13:48:45+5:30
यावेळी सरसंघचालक कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करतात याकडे स्वयंसेवक व सामाजिक वर्तुळासह राजकीय पक्षांचेदेखील लक्ष लागले आहे हे विशेष.
नागपूर :राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे मंगळवारी आयोजन करण्यात आले आहे. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुका व संघस्थापनेच्या शतकोत्तर वर्षाची तयारी या पार्श्वभूमीवर यंदाच्या विजयादशमी उत्सवाला महत्त्व आले आहे. यावेळी सरसंघचालक कोणत्या मुद्द्यांवर भाष्य करतात याकडे स्वयंसेवक व सामाजिक वर्तुळासह राजकीय पक्षांचेदेखील लक्ष लागले आहे हे विशेष.
संघप्रक्रियेत विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सवाचे विशेष महत्त्व असते. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील विजयादशमीच्या दिवशीच रेशीमबाग मैदानावर या उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. २४ ऑक्टोबर रोजी रेशीमबाग मैदान येथे सकाळी ७.४० वाजता हे आयोजन करण्यात आले आहे. प्रसिद्ध संगीतकार व गायक शंकर महादेवन हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील.
कार्यक्रम सुरू होण्याअगोदर संघ स्वयंसेवक पथसंचलन करतील व त्यानंतर उपस्थित अतिथींसमोर विविध कवायतींचे प्रात्यक्षिक करण्यात येईल. या उत्सवात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यावेळी स्वयंसेवकांना मार्गदर्शन करतील. सर्वसाधारणत: सरसंघचालकांच्या भाषणातून संघाच्या भविष्यातील योजना व भूमिकांचे संकेत मिळत असतात. त्यामुळे यंदाच्या उत्सवाला विशेष महत्त्व आले आहे.
या मुद्द्यांवर होणार मार्गदर्शन
आपल्या भाषणात सरसंघचालक थेट राजकीय मुद्द्यांना हात घालत नाहीत. मात्र ‘बिटविन द लाईन्स’ अनेक बाबींचे संकेत मिळतात.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदानाबाबत नागरिकांचे कर्तव्य यावर ते भाष्य करू शकतात. सोबतच देशातील वर्तमान सामाजिक व आर्थिक स्थिती, महागाईचा पडणारा भार, लोकसंख्या धोरण, खलिस्तान्यांकडून होणाऱ्या कुरापती, इस्त्रायल-हमासमधील युद्ध, केंद्र शासनाची कामगिरी, सामाजिक समरसता, आरक्षणाचा मुद्दा, ग्रामविकास, दुर्गम क्षेत्रांचे मागासलेपण, कुटुंब प्रबोधन, संस्कारांचा वाढत चाललेला अभाव, आत्मनिर्भर भारत, ईशान्येकडील राज्यांमधील स्थिती, संघ-शासन-समाजाचा समन्वय इत्यादींसंदर्भात डॉ. भागवत मार्गदर्शन करण्याची शक्यता आहे. यावेळी केंद्र तसेच राज्यातील मंत्रीदेखील उपस्थित राहण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.
स्वयंसेवकांमध्ये उत्साह
यंदा पुढील लोकसभा निवडणुकांच्या अगोदरचा अखेरचा विजयादशमी उत्सव असेल. संघाच्या शाखांची वाढलेली संख्या, वाढता दबदबा आणि संघाच्या कार्यक्रमांबाबत जनतेमध्ये निर्माण झालेले आकर्षण यामुळे यंदादेखील यासंदर्भात स्वयंसेवकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. या सोहळ्याचे सोशल माध्यमांवरदेखील थेट प्रसारण करण्यात येणार आहे.