सदस्यांच्या राजीनाम्यामागे दडले काय ?
By Admin | Published: November 29, 2014 02:49 AM2014-11-29T02:49:28+5:302014-11-29T02:49:28+5:30
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांसह नऊ सदस्यांनी राजीनामे दिले आहेत.
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांसह नऊ सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. मंडळाच्या योजनांकडे प्रशासनाकडून जाणूनबूजून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचे कारण सदस्यांनी समोर केले आहे. परंतु यामागील नेमके कारण दुसरेच असल्याची चर्चा विद्यापीठ वर्तुळात होत आहे. दरम्यान, अद्याप हे राजीनामे कुलगुरूंनी मंजूर केलेले नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
नागपूर विद्यापीठाच्या शारीरिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष डॉ. बबन तायवाडे यांच्यासह नऊ सदस्यांनी राजीनामे दिले आहेत. मंडळाने सुरू केलेल्या नव्या योजनांकडे प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा आरोप या सदस्यांनी केला आहे.
मंडळाने सुरू केलेल्या अनेक योजनांची प्रत्यक्ष अंमलबजावणी होऊ शकली नाही. ३ वर्षांपूर्वी विद्यापीठाने क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार केला होता. परंतु त्यानंतर मात्र असा कार्यक्रम आयोजितच झाला नाही.
राज्य पातळीवर निवड झालेल्या खेळाडूंकरिता शिबिर आयोजित करण्याची तरतूद करण्यात आली आहे.परंतु अशा प्रकारचे शिबिर एकदाही घेण्यात आले नाही. त्यामुळे खेळाडूंमध्ये हवा तसा समन्वय निर्माण होण्यास अडचणी येतात. शिवाय नागपूर विद्यापीठाला राज्य किंवा विभाग पातळीवरील क्रीडा स्पर्धांचे आयोजकत्व मिळाल्यास स्पर्धेत सहभागी होणाऱ्या चमूंसाठी कुलगुरूंतर्फे स्नेहभोज देण्यात येत होते. परंतु आता मात्र प्रशासनाने या योजनेकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे नाराजीतून राजीनामे दिल्याची माहिती एका सदस्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. (प्रतिनिधी)