नवे काय, विदर्भात हत्तींचे वास्तव्य १५० वर्षांपूर्वीचे !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2021 06:30 AM2021-10-22T06:30:00+5:302021-10-22T06:30:03+5:30

Nagpur News गडचिरोलीच्या जंगलात आता वाघ, बिबट व त्यापाठोपाठ हत्तीही दाखल झाले आहेत. अरण्यपुरुष मारुती चितमपल्ली म्हणतात, यात नवे काही नाही. कारण विदर्भातील हत्तींच्या वास्तव्याला १५० वर्षांपूर्वीचा इतिहास आहे.

What's new, elephants live in Vidarbha 150 years ago! | नवे काय, विदर्भात हत्तींचे वास्तव्य १५० वर्षांपूर्वीचे !

नवे काय, विदर्भात हत्तींचे वास्तव्य १५० वर्षांपूर्वीचे !

googlenewsNext
ठळक मुद्देमारुती चितमपल्ली म्हणाले, ‘हत्तीपागडी’चा अभ्यास करा, कॅरिडॉर कळेल !

 

नागपूर : छत्तीसगडमधील राजनांदगाव जिल्ह्यातून गडचिरोली जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात हत्तींचा कळप दाखल झाला आहे. माकडेही अपवादाने दिसणाऱ्या गडचिरोलीच्या जंगलात आता वाघ, बिबट व त्यापाठोपाठ हत्तीही दाखल झाले आहेत. सर्वसामान्यांसाठी हा औत्सुक्याचा विषय असला तरी, अरण्यपुरुष मारुती चितमपल्ली म्हणतात, यात नवे काही नाही. कारण विदर्भातील हत्तींच्या वास्तव्याला १५० वर्षांपूर्वीचा इतिहास आहे. ( elephants live in Vidarbha 150 years ago!)

गडचिरोलीच्या जंगलात हत्ती दाखल झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘लोकमत’ने मारुती चितमपल्ली यांच्याशी संपर्क साधला. ‘पक्षी जाय दिगंतरा’ या पुस्तकातील ‘हत्तीपागडी’ नावाच्या मोठ्या प्रकरणात त्यांनी विदर्भातील हत्तींच्या वास्तव्याचा उल्लेख केला आहे. ते म्हणाले, विदर्भातील जंगल म्हणजे हत्तींचा कॅरिडॉर आहे. भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोलीमधील जंगलांत हत्तींना पकडण्यासाठी त्या काळात मोठाले खोदलेले खड्डे म्हणजेच ‘हत्तीपागडी!’ ते आजही जंगलात तसेच आहेत. त्यात आता वृक्ष वाढले असले तरी, ते मोठाले खड्डे बुजलेले नाहीत. त्यांचा अभ्यास केला तर, विदर्भातील हत्तींचा कॅरिडॉर अभ्यासकांना आपोआपच कळेल.

स्थलांतरण होणारच

मारुती चितमपल्ली म्हणाले, वाघ, हत्तींचे कॅरिडॉर परंपरागत आहेत. आसाम - ओडिशा - मध्य प्रदेश - महाराष्ट्र असे हत्तींचे कॅरिडॉर आहे. अलीकडे त्यांच्या भ्रमणमार्गात अडथळे आल्याने क्षेत्र मर्यादित बनले आहे. स्थलांतराचे त्यांचे मार्ग प्रकल्पांमुळे अवरुद्ध झाले असले तरी, त्यांना कोणीच अडवू शकणार नाहीत. आज ना उद्या हे स्थलांतरण होतच राहणार. कर्नाटक राज्यातून हत्ती बेळगावमार्गे महाराष्ट्रातील चंदगड, आजरा, तिलारी, दोडामार्ग, तसेच कोकणात सावंतवाडीला स्थलांतरित होत आहेत. या पार्श्वभूमीवर छत्तीसगडमधून गडचिरोलीच्या जंगलातील हे स्थलांतरण सूचक आहे.

करावा लागणार संवर्धनाचा विचार

छत्तीसगड हे हत्तींचे माहेरघर आहे. गडचिरोलीच्या सीमावर्ती भागात झालेला त्यांचा प्रवेश म्हणजे भविष्यातील त्यांच्या आगमनाची चाहूल ठरू शकते. वाघांच्या आणि हत्तीच्या स्थलांतरासाठी तर फार मोठ्या सलग वनक्षेत्राची आणि भ्रमणमार्गांची आवश्यकता असते. यामुळे परराज्यांतून स्थलांतरित होणाऱ्या हत्तींचे विदर्भातील जंगलात संवर्धन होईल, असाच विचार विदर्भातील वन विभागाला करावा लागणार आहे.

...

Web Title: What's new, elephants live in Vidarbha 150 years ago!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.