सायबर गुन्ह्यांवर ‘व्हॉट्सअप’चा हंटर, चार महिन्यांत देशातील २.९४ कोटी खाती बंद

By योगेश पांडे | Published: June 21, 2024 11:54 PM2024-06-21T23:54:24+5:302024-06-21T23:54:39+5:30

ट्रेडिंगच्या जाळ्यासह व्हॉट्सअपच्या माध्यमातून ऑनलाईन फ्रॉड वाढीस : मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कारवाईत वाढ

WhatsApp's hunter on cyber crimes, closed 2.94 crore accounts in the country in four months | सायबर गुन्ह्यांवर ‘व्हॉट्सअप’चा हंटर, चार महिन्यांत देशातील २.९४ कोटी खाती बंद

सायबर गुन्ह्यांवर ‘व्हॉट्सअप’चा हंटर, चार महिन्यांत देशातील २.९४ कोटी खाती बंद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशभरात मागील काही काळापासून सायबर गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढत असून अनेक गुन्हेगारांकडून व्हॉट्सअपच्या प्लॅटफॉर्मचा वापर करण्यात येत आहे. यासंदर्भात युझर्स, सरकारी यंत्रणेकडून प्राप्त झालेल्या तक्रारींच्या अनुषंगाने व्हॉट्सअपकडून कारवाईचा हंटर उगारण्यात येत आहे. २०२४ च्या पहिल्या चार महिन्यांत गैरप्रकारात सहभागी असलेली व्हॉट्सअपची २.९४ कोटी खाती बंद करण्यात आली आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा कारवाईचा वेग वाढल्याचे दिसून येत आहे.

व्हॉट्सअपच्या माध्यमातून सायबर गुन्हेगारांकडून मोठ्या प्रमाणावर फ्रॉड करण्यात येत आहे. विशेषत: शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली व्हॉट्सअप ग्रुपला जोडून गंडविण्याचे प्रकार वाढले आहेत. ‘लोकमत’ने या संपूर्ण प्रकारावर सविस्तर प्रकाश टाकला होता. याशिवाय व्हॉट्सअपच्या माध्यमातून महिलांची छळवणूक, फेक न्यूज इत्यादी गैरप्रकारदेखील करण्यात येतात. याबाबत युझर्ज किंवा सरकारी यंत्रणेच्या तक्रारींची व्हॉट्सअपकडून दखल घेण्यात येते. व्हॉट्सअपने २०२१ सालापासून अशी खाती बंद करणे सुरू केले होते. मात्र आता कारवाईचा वेग वाढला आहे. २०२४ मध्ये पहिल्या चार महिन्यांत २.९४ कोटी खाती बंद करण्यात आली. मार्च महिन्यात सर्वाधिक ७९ लाख ५४ हजार खाती बंद झाली.

-व्हॉट्सअपकडून कारवाईमध्ये वाढ

२०२३ मध्ये व्हॉट्सअपकडून वर्षभरात एकूण ८ कोटी ३७ लाख ४२ हजार २६३ खाती बंद करण्यात आली होती. दर महिन्याची सरासरी ६९ लाख ७८ हजार ५२१ इतकी होती. मात्र या वर्षी कारवाईत आणखी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. यावर्षी दर महिन्याची सरासरी ७३ लाख ७३ हजार इतकी आहे. यंदा कारवाईत ५.६२ टक्क्यांची वाढ झाली आहे.

-सायबर फ्रॉडशी संबंधित खात्यांचे प्रमाण अधिक

भारतात अस्तित्वात असलेल्या तसेच माहिती व तंत्रज्ञान खात्याने लागू केलेल्या डिजिटल मीडियासाठीच्या नियमांचा भंग केल्यावरून ही कारवाई करण्यात येत आहे. व्हॉट्सअपकडून ज्या युझर्सची खाती बंद करण्यात आली आहेत, ते आता या मॅसेजिंग प्लॅटफॉर्मचा वापर करू शकणार नाहीत. यातील बहुतांश खाती सायबर फ्रॉड आणि घोटाळ्यांशी संबंधित आहेत, तर काहींनी व्हॉट्सॲपच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे अहवालात उघड झाले आहे. अनेक खात्यांच्या माध्यमातून निवडणुकांच्या जाहिराती तसेच टेलिमार्केटिंग करण्यात येत होते. व्हॉट्सअपकडून ॲडव्हान्स लर्निंग मशीन, डेटा ॲनालिसिस व अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही कारवाई करण्यात येते.

२०२३ मधील कारवाई

महिना : बंद झालेली खाती

जानेवारी २०२३ : २९,१८,०००
फेब्रुवारी २०२३ : ४५,९७,४००
मार्च २०२३ : ४७,१५,९०६
एप्रिल २०२३ : ७४,४२,५००
मे २०२३ : ६५,०८,००९
जून २०२३ : ६६,११,७००
जुलै २०२३ : ७२,२८,०००
ऑगस्ट २०२३ : ७४,२०,७४८
सप्टेंबर २०२३ : ७१,११,०००
ऑक्टोबर २०२३ : ७५,४८,०००
नोव्हेंबर २०२३ : ७१,९६,०००
डिसेंबर : ६९,३४,०००


२०२४ मधील कारवाई

महिना : बंद झालेली खाती
जानेवारी २०२४ : ६७,२८,०००
फेब्रुवारी २०२४ : ७६,२८,०००
मार्च २०२४ : ७९,५४,०००
एप्रिल २०२४ : ७१,८२,०००
 

Web Title: WhatsApp's hunter on cyber crimes, closed 2.94 crore accounts in the country in four months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.