गहू, हरभऱ्याचे भाव काेसळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2021 04:09 AM2021-03-17T04:09:48+5:302021-03-17T04:09:48+5:30
ब्रिजेश तिवारी काेंढाळी : काटाेल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी गहू व हरभऱ्याच्या पिकाची मळणी केली असून, हे दाेन्ही शेतमाल ...
ब्रिजेश तिवारी
काेंढाळी : काटाेल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी गहू व हरभऱ्याच्या पिकाची मळणी केली असून, हे दाेन्ही शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणले आहेत. परंतु, या दाेन्ही शेतमालाला बाजारात केंद्र शासनाने यावर्षी जाहीर केलेल्या किमान आधारभूत किमतीएवढाही भाव मिळत नाही. दुसरीकडे, शासनाने या दाेन्ही शेतमालांची खरेदीदेखील अद्याप सुरू केली नाही. त्यामुळे माेठे नुकसान हाेत असल्याची माहिती तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी दिली.
यावर्षीच्या खरीप हंगामात प्रतिकूल वातावरण, अतिवृष्टी, कीड व राेगांचा प्रादुर्भाव यामुळे दाेन्ही तालुक्यातील साेयाबीनचे पीक पूर्णपणे उद्ध्वस्त झाले. शिवाय, गुलाबी बाेंडअळी आणि बाेंडसडमुळे कापसाच्या उत्पादनात प्रचंड घट आली. अंबिया बहाराचा संत्रा कवडीमाेल भावाने विकला गेला तर मृग बहाराच्या संत्र्याची दाेन्ही तालुक्यातील ८५ टक्के बागांमध्ये फलधारणाही फारशी नव्हती. त्यामुळे काटाेल व नरखेड तालुक्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी गहू व हरभरा या रब्बीच्या पिकांवर लक्ष केंद्रित केले हाेते.
सुरुवातीच्या काळात या दाेन्ही पिकांची अवस्था चांगली हाेती. तालुक्यात अवकाळी पावसाच्या सरी बरसल्या असल्या तरी या पावसामुळे दाेन्ही पिकांचे फारसे नुकसान झाले नाही. त्यामुळे दाेन्ही शेतमालाला चांगला भाव मिळण्याची आशा शेतकऱ्यांच्या मनात निर्माण झाली हाेती. शेतकऱ्यांनी दाेन्ही शेतमाल मळणी करून बाजारात विकायला आणला असता, गव्हाला प्रति क्विंटल १,६०० ते १,७०० रुपये आणि हरभऱ्याला प्रति क्विंटल ४,००० रुपये ते ४,७०० रुपये भाव मिळत आहे.
हा प्रकार स्थानिक लाेकप्रतिनिधी व इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांना माहीत असूनही कुणीही बाेलत नाही, असा आराेपही शेतकऱ्यांनी केला आहे. बाजारात गहू व हरभरा उत्पादकांची आर्थिक लूट हाेत असल्याने ही लूट थांबवावी आणि केंद्र व राज्य शासनाने दाेन्ही तालुक्यांमध्ये गहू व हरभरा खरेदी केंद्र तातडीने सुरू करून या दाेन्ही शेतमालांची माेठ्या प्रमाणात खरेदी करावी अशी मागणीही मासाेद (ता. काटाेल) येथील प्रकाश बारंगे, रिंगणाबाेडी (ता. काटाेल) येथील संजय नागपुरे यांच्यासह काटाेल व नरखेड तालुक्यातील शेतकऱ्यांनी केली आहे.
....
‘एमएसपी’चा उपयाेग काय?
केंद्र शासनाने सन २०२१-२२ या रब्बी हंगामासाठी गव्हाची किमान आधारभूत किंमत (एमएसपी) प्रति क्विंटल १,९७५ रुपये तर हरभऱ्याची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल ५,१०० रुपये जाहीर केली आहे. गव्हाला बाजारात १,६०० ते १,७०० रुपये प्रति क्विंटल भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांचे प्रति क्विंटल २७५ ते ३७५ रुपयांचे तर हरभऱ्याला प्रति क्विंटल ४,००० रुपये ते ४,७०० रुपये भाव मिळत असल्याने ४०० ते १,१०० रुपयांचे नुकसान हाेत आहे. त्यामुळे ‘एमएसपी’चा उपयाेग काय, असा प्रश्नही शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
...
शासकीय खरेदीचा तिढा
शासनाच्यावतीने दाेन्ही तालुक्यांमध्ये केवळ हरभऱ्याची खरेदी केली जात असून, गव्हाची खरेदी केली जात नाही. या हंगामात काटाेल व नरखेड येथे हरभऱ्याचे खरेदी केंद्र सुरू करण्याची घाेषणा शासनाने केली असून, ऑनलाईन नाेंदणीही प्रक्रियादेखील सुरू केली. वास्तवात, खरेदी केंद्र सुरूच करण्यात आले नाही. शासनाने ही खरेदी केंद्र सुरू न केल्याने बाजारातील स्पर्धा कमी झाल्याचा आराेपही काही शेतकऱ्यांनी केला आहे.