नागपूर जिल्ह्यातील गव्हाचे पीक वाळण्याच्या मार्गावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2018 11:53 AM2018-03-05T11:53:55+5:302018-03-05T11:54:02+5:30
सध्या गहू भरण्याचा काळ असून, पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. मौदा तालुक्यात सिंचनाची प्रभावी साधने नसल्याने पाण्याअभावी गव्हाचे पीक सध्या सुकण्याच्या मार्गावर आहे.
कालव्याचे पाणी सोडा : शेतकऱ्यांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : धानाची कापणी केल्यानंतर काही शेतकऱ्यांनी गव्हाची पेरणी केली आहे. सध्या गहू भरण्याचा काळ असून, पिकाला पाण्याची नितांत गरज आहे. मौदा तालुक्यात सिंचनाची प्रभावी साधने नसल्याने पाण्याअभावी गव्हाचे पीक सध्या सुकण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गव्हाच्या पिकाला संजीवनी देण्यासाठी ओलितासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी कालव्यात सोडावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
मौदा तालुक्यात हक्काचे ओलिताचे साधन नाही. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांना कालव्याच्या पाण्यावर अवलंबून राहावे लागते. तालुक्यात तलाव व बंधाऱ्यांची संख्या बरीच असली तरी बहुतांश तलाव व बंधारे दुरुस्तीअभावी गाळ साचल्याने बुजल्यागत झाले आहेत. तालुक्यातील शेतकऱ्यांनी धानाची कापणी करून गव्हाची पेरणी केली. गव्हाचे पीक ११० ते १३० दिवसांचे आहे. विशेष म्हणजे, शेतकऱ्यांनी पेंच प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी मिळणार अशी आशा बाळगत गव्हाची पेरणी केली.
सुरुवातीला पेंच प्रकल्पाचे पाणी कालव्यात सोडल्याने पिकाला पाणी मिळाले. त्यामुळे आजवर गव्हाचे पीक जोमदार होते. सध्या गव्हाचे दाणे भरण्याचा काळ आहे. या काळात गव्हाच्या पिकाला पाण्याची नितांत गरज असते. मात्र, याच काळात ओलितासाठी पाणी मिळेनासे झाले आहे.
उशिरा पेरणी व थंडीचा जोर कमी झाल्याने तसेच सिंचनासाठी पाणी मिळत नसल्याने गव्हाचे दाणे अपरिपक्व राहण्याची शक्यता बाळावली असून, यातून गव्हाचे उत्पादन व दर्जा खालावणार आहे. शिवाय, काही शिवारातील गव्हाचे पीक आता पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर आहे. त्यामुळे गवहाचे पीक वाचविण्यासाठी पेंच प्रकल्पाचे पाणी सिंचनासाठी तत्काळ उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी खात व परिसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.