स्पार्किंगमुळे गव्हाला आग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:06 AM2021-03-29T04:06:41+5:302021-03-29T04:06:41+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क धामणा : शेतातून गेलेल्या विजेच्या लाेंबकळलेल्या तारांचा एकमेकींना स्पर्श झाला आणि स्पार्किंगमुळे ठिणगी पडल्याने गव्हाच्या पिकाने ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
धामणा : शेतातून गेलेल्या विजेच्या लाेंबकळलेल्या तारांचा एकमेकींना स्पर्श झाला आणि स्पार्किंगमुळे ठिणगी पडल्याने गव्हाच्या पिकाने पेट घेतला. परिसरातील शेतकऱ्यांनी या आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने गव्हासह वांग्याच्या पिकाचे माेठे नुकसान टळले. ही घटना नागपूर-अमरावती राष्ट्रीय महामार्गावरील धामणा (ता. नागपूर ग्रामीण) नजीकच्या माेहगाव (खुर्द) शिवारात रविवारी (दि. २८) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली.
नामदेव वासेकर, रा. माेहगाव (खुर्द) यांची माेहगाव (खुर्द) शिवारात पाच एकर शेती आहे. त्यांनी यावर्षी या दीड एकरात गव्हाची पेरणी केली हाेती तर काही भागात वांग्याची लागवड केली आहे. गव्हाचे पीक कापणीला आले हाेते. त्यांच्या शेतातून विजेच्या तारा गेल्या असून, रविवारी सायंकाळी त्या तारांचा एकमेकांना स्पर्श झाल्याने स्पार्किंग झाले व ठिणगी पडली. त्या ठिणगीमुळे शेतातील कचऱ्यासह वाळलेल्या गव्हाच्या पिकाने पेट घेतला.
आग लागल्याचे लक्षात येताच नरेश पारधी, अनिल वासेकर, विजय थुटूरकर, शंकर धनविजय, राजू पारधी, अंकुश शेंडे, रोशन बारसे, नितीन वासेकर, दीपक वासेकर, राजू तुरणकर, उदय गुप्ता, सुरेश वनकर, दादाराव थुटूरकर यांच्यासह इतरांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्यांना या आगीवर वेळीच नियंत्रण मिळवण्यात यश आल्याने गव्हाचे पीक पूर्णपणे जळण्यावाचून वाचले. त्यामुळे शेतकऱ्याचे माेठे नुकसान टळले.