आगीत गव्हाची गंजी खाक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:12 AM2021-05-05T04:12:25+5:302021-05-05T04:12:25+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क जलालखेडा : शेतात कापणी करून ठेवलेल्या गव्हाच्या गंजीला अचानक आग लागल्याने संपूर्ण गहू पीक जळून खाक ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
जलालखेडा : शेतात कापणी करून ठेवलेल्या गव्हाच्या गंजीला अचानक आग लागल्याने संपूर्ण गहू पीक जळून खाक झाले. आगीमुळे शेतातील २३० झाडे जळाली. यात शेतकऱ्याचे अंदाजे २६ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले. ही घटना जलालखेडा शिवारात शुक्रवारी (दि.३०) दुपारच्या सुमारास घडली.
महेश प्यारेलाल चाैधरी, रा. जलालखेडा, ता. नरखेड यांची जलालखेडा शिवारात साडेतीन एकर शेती असून, त्यांनी संपूर्ण शेतात गहू व माेसंबीच्या ६०० झाडांची लागवड केली आहे. दरम्यान, शुक्रवारी दुपारी २.३० वाजेच्या सुमारास मेंढपाळाने शेतातील गव्हाच्या गंजीला आग लागल्याची सूचना दिली. माहिती मिळताच शेतकरी महेश चाैधरी व कुटुंबीयांनी शेतात धाव घेतली. मात्र, ताेपर्यंत संपूर्ण गहू पीक जळून खाक झाले हाेते, तसेच आगीमुळे शेतातील २३० माेसंबीची झाडे जळाली. आगीचे कारण कळू शकले नाही. या घटनेमुळे शेतकऱ्याचे २५ लाख रुपयांच्या माेसंबी फळासह बाग, तसेच १ लाख २० हजार रुपयांचा गहू, असे एकूण २६ लाख २० हजार रुपयांचे नुकसान झाले. आगीच्या घटनेची माहिती संबंधित विभागाला देण्यात आली; परंतु चार दिवस उलटूनही पंचनामा करण्यासाठी एकही अधिकारी वा कर्मचारी घटनास्थळी आला नाही, अशी माहिती शेतकरी महेश चाैधरी यांनी दिली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यास शासनाने आर्थिक भरपाई द्यावी, अशी मागणी आहे.