नागपुरातून उड्डाण घेताना एअर अॅम्ब्युलन्सचे चाक तुटले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2021 04:09 AM2021-05-07T04:09:50+5:302021-05-07T04:09:50+5:30
विमानाच्या दोन तास आकाशात घिरट्या नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सायंकाळी इंधन भरण्यासाठी उतरलेल्या एअर अॅम्ब्युलन्सचे ...
विमानाच्या दोन तास आकाशात घिरट्या
नागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी सायंकाळी इंधन भरण्यासाठी उतरलेल्या एअर अॅम्ब्युलन्सचे एक चाक मुंबईकडे उड्डाण भरल्यानंतर धावपट्टीवर अचानक पडले. यासंदर्भात चालक दल अनभिज्ञ होते. नागपूर विमानतळाने या घटनेची माहिती वैमानिकाला दिली. त्यानंतर हे विमान मुंबई विमानतळावर सुखरूप उतरले. चाक का पडले, याचे कारण समजू शकले नाही.
मुंबई विमानतळावर उतरण्यापूर्वी हे विमान दोन तास आकाशात घिरट्या घालत होते. त्यानंतर वैमानिकाने अत्यंत कौशल्याने विमान धावपट्टीवर उतरविले. त्यावेळी कुठलीही अनुचित घटना घडली नाही. विमानातील रुग्ण, डॉक्टर आणि क्रू मेंबर सुखरूप आहेत.
प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी दुपारी पश्चिम बंगालच्या दुर्गापूर येथून मुंबईकरिता जेट सर्व्हिसेस प्रा.लि.च्या सी९० अॅम्ब्युलन्स विमानाने रुग्णाला घेतले. विमानात त्याच्यासह पॅरामेडिकल स्टाफ, एक डॉक्टर व विमानाचे दोन वैमानिक होते. सायंकाळी ५.०५ वाजता इंधन भरण्यासाठी विमान नागपूर विमानतळावर उतरले. इंधन भरल्यानंतर मुंबईकडे उड्डाण भरल्यानंतर विमानाचे एक चाक धावपट्टीवर पडले. तोपर्यंत विमान आकाशात झेपावले होते. या घटनेची सूचना नागपूर विमानतळाने वैमानिकाला दिली. त्याचवेळी वैमानिकाने मुंबईत विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. स्थिती अत्यंत गंभीर होती. वैमानिकाने मुंबई हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून बेली लँडिंगची परवानगी मागितली. धावपट्टीवर आवश्यक उपाययोजना केल्यानंतर विमान उतरविण्यास परवानगी देण्यात आली. विमान मुंबई विमानतळावर उतरण्यापूर्वी दोन तास आकाशात घिरट्या घालत होते. त्यानंतर रात्री ९.१५ वाजता उतरविण्यात आले.