चाके थांबली; ४० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2018 11:05 PM2018-07-21T23:05:47+5:302018-07-21T23:07:29+5:30

डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या नेतृत्वात सुरू असलेल्या वाहतूक बंद आंदोलनात नागपुरातील ट्रकमालक व वाहतूकदारांची संघटना नागपूर ट्रकर्स युनिटीने सहभाग घेतल्यामुळे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी नागपूर आणि लगतच्या परिसरातील १८ ते २० हजार ट्रक जागेवरच उभे आहेत. त्यामुळे दुस-या दिवशी ट्रक मालक आणि वाहतूकदारांचे सुमारे ४० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती नागपूर ट्रकर्स युनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांनी लोकमतशी बोलताना दिली.

The wheels stopped; 40 crores loss | चाके थांबली; ४० कोटींचे नुकसान

चाके थांबली; ४० कोटींचे नुकसान

Next
ठळक मुद्देवाहतूकदारांच्या संपाची झळ : नागपूर ट्रकर्स युनिटी, केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा निष्फळ

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करण्याच्या मागणीसाठी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेच्या नेतृत्वात सुरू असलेल्या वाहतूक बंद आंदोलनात नागपुरातील ट्रकमालक व वाहतूकदारांची संघटना नागपूर ट्रकर्स युनिटीने सहभाग घेतल्यामुळे आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी नागपूर आणि लगतच्या परिसरातील १८ ते २० हजार ट्रक जागेवरच उभे आहेत. त्यामुळे दुस-या दिवशी ट्रक मालक आणि वाहतूकदारांचे सुमारे ४० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती नागपूर ट्रकर्स युनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांनी लोकमतशी बोलताना दिली.
जीवनावश्यक मालाची वाहतूक सुरू
आंदोलनामुळे मालाची ये-जा बंद आहे. केवळ औषध, भाजीपाला, दूध आदींसह अन्य जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक आहे. आंदोलन पुन्हा काही दिवस सुरू राहिल्यास जीवनावश्यक मालाची वाहतूक बंद करू, अशी घोषणा मारवाह यांनी केली. बंदच्या दुस-या दिवशी नागपूर ट्रकर्स युनिटीचे पदाधिकारी आणि जवळपास ३०० ट्रकमालकांनी शनिवारी पारडी, महालगाव कापसी, मौद्यापर्यंत फेरी मारली आणि वाहतूकदारांना ट्रक वाहतूक बंद करण्याचे आवाहन केले. शिवाय रस्त्यातील टोल नाक्यावर शासनाच्या विरोधात नारे-निदर्शन केली. यावेळी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होता.
डिझेल विक्रीला फटका, कामगार उपाशी
मारवाह म्हणाले, आंदोलनामुळे महामार्गावर ट्रकची ये-जा जवळपास बंद आहे. स्थानिकांसोबत दुस-या राज्यातून ट्रक येणे बंद आहे. पहिल्या दिवशी जे ट्रक आलेत, ते रस्त्याच्या कडेला उभे आहेत. यामुळे टोल नाक्याची आवक बंद झाली आहे. तसेच पेट्रोल व डिझेल पंपावर डिझेलची विक्री नगण्य आहे. त्याचा फटका पंपचालकांना बसला आहे. वाहतुकीवर अवलंबून असणारे कामगारांना रोजगार नसल्यामुळे त्यांच्या कुटुंबांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.       व्यापा-यांचा माल वाहतूकदारांच्या गोडाऊनमध्ये असल्यामुळे व्यापारीही बंदला समर्थन देतील, अशी अपेक्षा आहे. देशात सिमेंट, कोळसा, लोखंड आणि अन्य मालाची वाहतूक जवळपास ठप्प पडली आहे. व्यापा-यांनाही नुकसान सोसावे लागत आहे. देशात जीवनाश्यक वस्तूंची वाहतूक बंद झाल्यास दैनंदिन वस्तूंच्या किमती महाग होण्याची शक्यता मारवाह यांनी व्यक्त केली. पेट्रोल आणि डिझेलचा जीएसटीमध्ये समावेश करावा आणि इंधनाच्या निरंतर होणा-या दरवाढीवर नियंत्रण आणावे, केरोसिनवर अनुदान द्यावे आणि अन्य मागण्यांसाठी आंदोलन सुरू आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतीनुसार डिझेलचे दर ३५ रुपये असावे. जीएसटीमध्ये समावेश केल्यास दर निश्चितच कमी होतील, असे मारवाह म्हणाले.
एक ट्रकवर रोज पाच हजारांचा खर्च
बँकांचे हप्ते, विमा, देखरेख खर्च, चालक आदींचा मिळून एका ट्रकवर दररोज पाच हजारांचा खर्च येतो. ट्रक जागेवर उभे असल्यामुळे ट्रक मालकांना नुकसान होत आहे. केंद्र सरकार असोसिशनचे ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. तसे पाहता देशातील अनेक मोठे उद्योग बंद पडल्यामुळे आधीच मालवाहतूक कमी झाली आहे. त्यातच डिझेलचे दर वाढल्यामुळे अनेक जण हा व्यवसाय बंद करण्याच्या तयारीत आहे. या व्यवसायला संजीवनी देण्यासाठी डिझेलचे दर कमी करण्याची मागणी आहे. यापूर्वीही ट्रक मालकांनी आंदोलन केले होते. पण असोसिशनला आश्वासन देऊन आंदोलनात फूट पाडली. आता सरकारने मागण्या मान्य करता पूर्वीप्रमाणेच आश्वासन देऊन आंदोलनात फूट पाडली तर देशात ट्रक मालक व वाहतूकदार कधीही आंदोलन करणार नाहीत, असे मारवाह म्हणाले.
गोयल आणि गडकरींसोबत बोलणी निष्पळ
आंदोलनाच्या एक दिवसाआधी आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसचे अध्यक्ष एस.के. मित्तल यांच्यासोबत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक झाली. पण या बैठकीत मागण्यांवर तीन महिन्यात निर्णय घेण्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिल्याने पदाधिका-यांनी बैठकीतून काढता पाय घेतला आणि आंदोलन सुरू केले. बंद आंदोलन मागे घेऊ नये, अशी ट्रक मालकांची मागणी आहे.
शनिवारी नागपूर ट्रकर्स युनिटीचे अध्यक्ष कुक्कू मारवाह यांच्या नेतृत्वात आंदोलन झाले. यावेळी सचिव राजिंदरसिंह सैनी, प्रीतमसिंह सैनी, महेंद्र जैन, महेंद्र लुले, अवतार सिंह, महेंद्रबाल सिंह, टोनी जग्गी, गुरुदयालसिंह पड्डा, हातीमभाई, सुरेंद्रसिंग सैनी, कर्नाल सिंग, जसवंत शर्मा आणि असोसिएशनचे इतर पदाधिकारी आणि वाहतूकदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खासगी बसेसची सेवा सुरळीत
आॅल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेस संघटनेचा संपाला शुक्रवारी ट्रॅव्हल्स असोसिएशन आॅफ नागपूरने एक दिवसीय समर्थन दिले होते. यामुळे २००-२५० बसची चाके थांबली होती. याचा फटका शेकडो प्रवाशांना बसला. एसटी महामंडळाच्या बसेस क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी घेऊन धावल्या. परंतु शनिवारी पुन्हा खासगी बसेसची सेवा सुरळीत झाल्याने प्रवाशांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
स्कूल बस असोसिएशन संपापासून दूरच
नागपूर वगळता राज्यात इतर ठिकाणी स्कूल बस असोसिएशनने संपाला पाठिंबा दर्शविला आहे. परंतु सूत्रानूसार नागपुरात काही बसेस संपात सहभागी झाल्याची माहिती आहे. राज्य स्कूल बस असोसिएशनने नागपूरच्या शालेय विद्यार्थी बस वाहतूकदार कल्याणकारी संघाला विश्वासात न घेता संप पुकारला. या संपात स्कूलबसच्या मागण्याही नसल्याने संघ तूर्तास तरी संपापासून दूर आहे. संघाचे अध्यक्ष राजेंद्र सिंग यांनी याला दुजोरा दिला आहे.

 

Web Title: The wheels stopped; 40 crores loss

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.