४२ आदिवासी जेव्हा नागपुरात एकविसाव्या शतकाची झलक पाहतात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 07:29 PM2018-09-18T19:29:55+5:302018-09-18T19:32:33+5:30

नागपूरच्या मोठ्या सिमेंटरोडवून वेगाने धावणाऱ्या गाड्या, रस्त्याच्या कडेला असलेले मोठाले होर्डिंग्ज, चकाकणारी दुकाने, अत्याधुनिक कपडे घातलेली तरुणाई.. किती पाहू न् किती नाही..

When the 42 tribals see the 21st century in Nagpur ... | ४२ आदिवासी जेव्हा नागपुरात एकविसाव्या शतकाची झलक पाहतात...

४२ आदिवासी जेव्हा नागपुरात एकविसाव्या शतकाची झलक पाहतात...

Next
ठळक मुद्देलोकबिरादरी प्रकल्पाचा उपक्रमशहरातील चकाकी व गतीमान गाड्यांना पाहून डोळे विस्फारलेरस्ता ओलांडणे अवघड

वर्षा बाशू
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर:

काय काय डोळ््यात साठवून ठेवावे आणि काय काय लक्षात ठेवावे... जीव नुसता धाकधूक होतोय.. भिती वाटतेय आणि पहावेसेही वाटतेय... मेट्रो रेल्वेच्या थंडगार डब्यात त्याची भिरभिरती अचंबित नजर कुठेच ठरत नाहीये...
हा प्रसंग आहे, मंगळवारी संध्याकाळी नागपुरात येऊन दाखल झालेल्या आदिवासींचा. गडचिरोली जिल्ह्यातल्या आलापल्ली तालुक्याच्या बेजोर गावातील ४२ आदिवासी स्त्रीपुरुष नागपूर पहाण्यासाठी आले आहेत. आपल्या गावापासून काही अंतरावर असलेली अन्य गावे तसेच आलापल्ली आणि अहेरी ही तालुक्याची दोन ठिकाणे वगळता या आदिवासींनी काहीही पाहिलेलं नाही. घनदाट जंगलापलिकडचं जग कसं आहे, त्यात काय काय घडत असतं, हे आदिवासींना समजावं यासाठी भामरागडमधील हेमलकसा येथे असलेल्या डॉ. प्रकाश आमटे व डॉ. मंदा आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाने गेल्या चार वर्षांपासून हा उपक्रम राबविला आहे. दोन गावांमधील आदिवासींना नागपूर शहरात दोन दिवसांसाठी नेऊन तेथील काही महत्त्वाची ठिकाणे दाखविली जातात.

रेल्वेगाडीचे प्रचंड कुतूहल
आदिवासींना रेल्वेगाडीचे अत्याधिक कुतूहल असते. बसगाड्या, विमाने यांचेही त्यांना आकर्षण आहे. या भेटीत ते रेल्वे स्टेशन, बसस्टँड, विमानतळ, मॉल आदी ठिकाणांना भेटी देणार आहेत. नागपुरात दाखल होताच त्यांना दीक्षाभूमीवर नेण्यात आले. तेथून गोवारी स्मारकाला भेट दिली व मेट्रो रेल्वेची प्रतिकृतीही त्यांनी पाहिली. चौकातून रस्ता क्रॉस करताना त्यांची धावपळ पाहून वाहनचालक स्वत:हूनच वेग आवरत त्यांना जाण्यासाठी वाट करून देत होते.
४२ जणांच्या या ग्रूपमध्ये ७ वर्षांची लहान मुलगी आहे आणि साठी ओलांडलेले आजोबाही आहेत. केये कुंडी आत्राम, गोंगलू लच्छू दुवी, गिस्सू पुसू आत्राम, रैनू चुक्कू मुळमा, सोमा रामा तेलामी, भिंगरी नरंगो आत्राम, राजे दसरू आत्राम यांच्यासह त्यांचे अन्य सोबती आहेत.

कसं वाटलं नागपूर?
या प्रश्नाला सध्या कोणतेच उत्तर त्यांना सुचत नाहीये.. मंत्रमुग्ध अवस्थेतून बाहेर आल्यावर किंवा गावी परत गेल्यावर ते कदाचित अनुभव व्यक्त करू शकतील. मात्र एक गोष्ट नक्की घडेल, आता येणाºया पिढीला सांगायला त्यांच्याजवळ निश्चितच काहीतरी वेगळं असेल. त्यांच्या रोजच्या जगण्यात काही बदल करता येईल काय, असा विचार त्यांच्या मनात येऊ शकेल.. कदाचित तो बदल शेतीतला असेल, शिक्षणातला असेल किंवा मासेमारीतला असेल.. बदलाचे एक बीज तर नक्कीच रुजले जाईल.

Web Title: When the 42 tribals see the 21st century in Nagpur ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.