बंदी असलेल्या नायलॉनवर कारवाईचा मुहूर्त कधी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2020 10:26 PM2020-10-19T22:26:34+5:302020-10-19T22:31:12+5:30
Nylon Manza, selling, Nagpur News पतंग उडविण्याच्या धाग्याची अर्थात मांजाची जागा जीवघेण्या नायलॉन मांजाने घेतली आहे. याचे दुष्परिणाम दिसताच त्याच्या वापरावर बंदी घातली गेली तरी कारवाईशून्यतेच्या प्रशासकीय हलगर्जीपणाने नायलॉन मांजाचा वापर सर्रास होत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सदा उंच भरारी घेण्याचा संदेश देणाऱ्या पतंगाचा धागा आपल्या हातात असतो आणि तो धागा नैतिकतेचा, संवेदनेचा अन् सुरक्षेचा असावा असा पारंपारिक दंडक आहे. मात्र, व्यवसायाच्या स्पर्धेत साऱ्याच सुज्ञ परंपरांना केराची टोपली दाखवली गेली आणि जीवघेण्या साधनांचा वापर केवळ हेका म्हणून वापरात आला. पतंग उडविण्याच्या धाग्याची अर्थात मांजाची जागा जीवघेण्या नायलॉन मांजाने घेतली आहे. याचे दुष्परिणाम दिसताच त्याच्या वापरावर बंदी घातली गेली तरी कारवाईशून्यतेच्या प्रशासकीय हलगर्जीपणाने नायलॉन मांजाचा वापर सर्रास होत आहे.
मकरसंक्रांतीच्या पर्वावर जानेवारीमध्ये पतंग आणि मांजाची मागणी प्रचंड असते. त्याअनुषंगानेच याचा व्यापारही त्याच काळात जोर पकडतो. मात्र, पावसाळा आटोपताच पतंग उडविण्याच्या मौजेला सुरुवात होत असते. गुलाबी गार वाऱ्याच्या संगतीने पतंग उडविण्याचा आनंद न्याराच असतो. तो आनंद घेताना बच्चे कंपनी आणि काही मोठी मंडळी आता दिसायला लागली आहे. या हौसेला साथ देण्यासाठी पतंग आणि मांजाची विक्री होत आहे. नायलॉन मांजाही उपलब्ध होत आहे. उंच आकाशात पतंगांची पेच रंगते तेव्हा प्रतिस्पर्धी पतंगबाजाला नामोहरम करण्यासाठी नायलॉन मांजा इतर साधारण मांजापेक्षा उजवाच ठरतो. अतिशय मजबूत आणि धारदार असल्याने शौकीन दुकानदाराकडे हाच मांजा मागतात. मात्र, या मांजाचे बरेच दुष्परिणाम दिसायला लागल्याने दोन वर्षापूर्वीच या मांजावर बंदी घातली गेली आहे. रस्त्याने वाहन चालविणाऱ्यांचे गळे या मांजाने कापल्याची आणि अनेकांना प्राण गमवावे लागल्याची अनेक उदाहरणे नागपुरात आहेत. असे असतानाही हा मांजा वापरणाऱ्यांना म्हणा किंवा विकणाऱ्यावर कुठलीच कारवाई होताना दिसत नाही. कारवाईसाठी संक्रांतीचीच वाट बघणार का, असा प्रश्न यामुळे निर्माण होत आहे.
आतल्या दरवाजाने होतेय विक्री
सीझन नसल्याने अजूनही दुकाने थाटली नाहीत. मात्र, अनेकांच्या घरूनच पतंग व मांजाचा व्यापार चालतो. बंदी असल्याने नायलॉन मांजा दुकानात ठेवला जात नाही. मात्र, ग्राहकाने मागणी केल्यास हा मांजा उपलब्ध केला जातो.
साधा मांजा गायबच
नायलॉनच्या आगमनानंतर आणि बंदी असल्यावरही सर्वत्र नायलॉन मांजाच दिसून येत आहे. साधा मांजा केवळ दुकानाची शोभा वाढविण्यासाठी असल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे पशुपक्षी या मांजाला जास्त बळी पडत आहेत. असे असतानाही वनविभागाकडून आणि प्रशासनाकडून कुठलीही कारवाई केली जात नाही.