ग्रामीण भागात १८ ते ४५ वर्षे वयोगटांचे लसीकरण कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:08 AM2021-05-09T04:08:56+5:302021-05-09T04:08:56+5:30
जलालखेडा : राज्यात १ मेपासून १८ ते ४५ वर्षे वयोगटांतील नागरिकांचे मोफत लसीकरण केल्या जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ...
जलालखेडा : राज्यात १ मेपासून १८ ते ४५ वर्षे वयोगटांतील नागरिकांचे मोफत लसीकरण केल्या जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली होती. त्यासाठी अॅपवर २८ एप्रिलपासून नोंदणीला सुरुवात करण्यात आली होती. अॅपवर नोंदणी केल्याशिवाय लसीकरण होणार नाही, असे शासनाकडून निर्देश देण्यात आले होते. दिलेल्या निर्देशानुसार नागरिकांनी नोंदणी करायला सुरुवात केली होती. शहरी भागातच नव्हे, तर ग्रामीण भागातही मोठ्या प्रमाणात युवकवर्गांनी नोंदणी केली होती. विशेष म्हणजे, ग्रामीण भागातील नागरिकांजवळ अँड्रॉइड मोबाइल नसताना, त्यांनी इतरांच्या मोबाइलचा वापर करून लसीकरणासाठी नोंदणी केली होती. नोंदणी करून आठ दिवस उलटूनही त्यांना अजूनपर्यंत लस मिळालेली नाही. अजूनपर्यंत ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये १८ ते ४५ वर्षे वयोगटांतील नागरिकांसाठी लसीकरण सुरू झालेले नाही. नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात फक्त तालुका स्तरावर तीनच ठिकाणी लसीकरणाला सुरुवात झाली आहे. मोजक्याच नागरिकांचे लसीकरण त्या केंद्रवार केले जात आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील युवकांना कधीपर्यंत लसीकरणासाठी वाट पाहावी लागणार आहे, हे सांगता येत नाही. लसीचा तुटवडा असल्यामुळे लसीकरण मोठ्या प्रमाणात सुरू करता येत नाही, असे सरकारकडून सांगण्यात येत आहे. मग व्यवस्था नव्हती, तर सरकारने घोषणा कशासाठी केली, असा सवाल ग्रामीण भागातील युवकाकडून विचारला जात आहे.
---
नरखेड तालुक्यात १८ ते ४५ वर्षे वयोगटांतील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आले नाही. काटोल येथे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. जलालखेडा हे गाव काटोल ते वरुड या मुख्य रस्त्यावर असून, येथे १८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करायला हरकत नाही. येथे ४५ च्या वरील वयोगटांतील नागरिकांसाठी लसीकरण सुरू आहे. लसीचा पुरवठा व्यवस्थित झाल्यास १८ ते ४५ वयोगटांतील नागरिकांचे लसीकरण शक्य आहे.
- प्रशांत वैखंडे
तालुका आरोग्य अधिकारी, नरखेड.
---
२८ एप्रिलला अॅपवर नोंद केली. माझे अद्याप लसीकरण झालेले नाही. ७ मे रोजी अॅप पाहिला तर काटोल येथे लसीकरण केंद्र सुरू असल्याचे दिसले. त्यानुसार, मी काटोल येथील केंद्र निवडले. शुक्रवारी काटोल येथे जाऊन लस घेतली. ग्रामीण भागातील युवकांना ही सुविधा गावातच उपलब्ध होणे गरजेचे आहे.
- योगेश जाणे, मदना.