आॅपरेशन भूमाफिया कधी ?

By admin | Published: May 15, 2017 02:10 AM2017-05-15T02:10:16+5:302017-05-15T02:10:16+5:30

मिहानसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि त्यापाठोपाठ उपराजधानीत विकासाला गती देणारे अनेक प्रकल्प आल्याने नागपूर शहर

When did the landlord? | आॅपरेशन भूमाफिया कधी ?

आॅपरेशन भूमाफिया कधी ?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मिहानसारखा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आणि त्यापाठोपाठ उपराजधानीत विकासाला गती देणारे अनेक प्रकल्प आल्याने नागपूर शहर आणि आजूबाजूच्या २५ किलोमीटरच्या परिसरातील जमिनी सोन्याच्या खाणी बनल्या. त्यामुळे जमिनीच्या खरेदी विक्रीत दलालांची भूमिका वठविणारे अनेक जण चक्क बिल्डर, लॅण्डडेव्हलपर्स झाले. भोळ्याभाबड्या जमीन मालकाची फसवणूक करून, बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यवधींच्या जमिनी हडपण्याचा धक्कादायक गोरखधंदा नागपुरात सुरू झाला. त्यातून अनेकांचे जीव गेले. कित्येक जमीनमालक अक्षरश: रस्त्यावर आले. काहींनी आत्महत्याही केली.

मानकापूरमधील अशाच प्रकारे कुख्यात भूमाफिया ग्वालबन्सी आणि टोळीने जमिनीच्या खरेदी विक्रीच्या सौद्याच्या नावाखालाी फसवणूक करून आर्थिक कोंडी केल्यामुळे भूपेश सोनटक्के नामक अभियंत्याने गळफास लावून आत्महत्या केली. भूमाफियासोबत पोलिसांची अभद्र युती असल्यामुळे तक्रार करूनही या प्रकरणाला तब्बल चार महिने दडवून ठेवण्यात आले. मात्र, सोनटक्केच्या बहिणीने भूमाफियाच्या धमक्यांना भीक न घालता पाठपुरावा सुरू ठेवल्यामुळे हे प्रकरण पोलीस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांच्या कानावर गेले. त्यांनी आणि सहआयुक्त शिवाजीराव बोडखे यांनी त्याची गंभीर दखल घेत प्रकरणाचा तपास तत्कालीन पोलीस उपायुक्त राकेश कलासागर यांच्याकडे सोपवला. कलासागर यांनी प्रामाणिक पोलिसांकडून त्याचा तपास करवून घेतल्याने सर्वत्र खळबळ उडवून देणारे भूमाफिया दिलीप ग्वालबन्सी आणि त्याच्या टोळीची कुकृत्ये उघडकीस आली. या टोळीने शेकडो लोकांच्या मालकीची पाचशे ते सातशे कोटींची जमीन हडपल्याचे उघड होताच पोलिसांनी धडाकेबाज कारवाईचा सपाटा लावून भूमाफिया ग्वालबन्सीचे साम्राज्य जमीनदोस्त केले. अजूनही गुन्हे दाखल करणे आणि कारवाई करण्याची प्रक्रिया सुरूच आहे. मात्र, हा प्रकार केवळ भूमाफिया ग्वालबन्सी पुरता मर्यादित नाही. उपराजधानीत ग्वालबन्सीसारख्याच अनेक भूमाफियांच्या टोळ्या आहेत. त्यांनीही हजारो जमीन मालकांच्या जमिनी हडपल्या आहेत. शहरातील विविध भागात वळवणाऱ्या भूमाफियांच्या पिलावळीची माहिती पुढील प्रमाणे आहे. त्यांच्यावरही पोलिसांनी कडक कारवाई करावी, अशी मागणी ग्वालबन्सी प्रकरणाच्या निमित्ताने जोरदारपणे पुढे आली आहे.

जमिनीच्या वादातून झालेल्या हत्या
१९९९ ला बाळासाहेब अग्ने या तत्कालीन बिल्डर कम डेव्हलपर्सची सुपारी देऊन इंदोरच्या हल्लेखोरांकडून हत्या करवून घेण्यात आली होती. जमिनीच्या वादाचे अन् सुपारी किलिंगचे नागपुरातील हे पहिले प्रकरण होते.
पिंटू शिर्केची जमिनीच्या वादातूनच राजू भद्रे आणि त्याच्या साथीदारांनी चक्क कोर्टात हत्या केली होती. हे हत्याकांड नागपूरच नव्हे तर देशभर चर्चेला आले होते. या हत्याकांडातूनच राजू भद्रे नामक गॅगस्टर तयार झाला अन् त्याची दहशत पुढे वाढतच गेली.
तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे ज्येष्ठ आर्किटेक्ट एकनाथ निमगडे यांची हत्या कोट्यवधींच्या जमिनीसाठीच झाली. या प्रकरणात अनेकांची नावे पुढे आली. मात्र, ही हत्या नेमकी कुणी केली, त्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले नाही. शेवटी या प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपविण्यात आला.
अलीकडचे उदाहरण म्हणजे अजनीतील वैद्य दाम्पत्याच्या दुहेरी हत्याकांडाचे होय. किरण महल्ले नामक बिल्डरने अजनीतील वैद्य दाम्पत्याची जमीन हडपण्यासाठी हत्या केली आणि त्यांचे मृतदेह बुटीबोरी जवळच्या जंगलात नेऊन पुरले. तब्बल दोन महिन्यानंतर हे थरारक हत्याकांड उघडकीस आले होते.

इतवारी भागातील खंडणीबहाद्दर आता बडा भूखंड माफिया झाला आहे. भूखंड रिकामे करण्यासाठी आणि मालमत्ता हडप करून देण्यासाठी तो सुपाऱ्या घेतो. संघटित गुन्हेगारी टोळीचा तो म्होरक्या आहे. कधी कधी तो राजकीय आश्रयही घेतो. शांतिनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका प्रॉपर्टी डीलरच्या खुनात, अंबाझरी हद्दीतील एका बिल्डरला पोलीस ठाण्यात रिव्हॉल्व्हर दाखवून खंडणी मागण्यावरून तसेच मनीषनगर, बजाजनगर भागात दुसऱ्याच्या भूखंडावर कब्जा करण्यावरून त्याला अटक झाली होती. या भूखंडमाफियाच्या लक्ष्मीनगर, बजाजनगर, महाल, इतवारी, अमरावती रोड, वर्धा रोड या भागात जमिनी व भूखंड आहेत.

उत्तर नागपुरात वास्तव्य असलेल्या आणि सदर भागात सिक्युरिटी एजन्सी चालविणारा एक भूखंडमाफिया सिक्युरिटी एजन्सीच्या आड दुसऱ्याची मालमत्ता आणि भूखंड बळकावतो, वादग्रस्त मालमत्ता रिकामी करून देण्यासाठी खंडण्या घेतो. त्याच्या कोराडी भागात मोठ्या प्रमाणावर जमिनी आहेत. भूखंड वादातूनच झालेल्या एका राष्ट्रवादी काँग्रेस नेत्याच्या खुनात तो आरोपी होता. खुद्द फिर्यादीच फितूर झाल्याने तो सत्र न्यायालयातून निर्दोष सुटला होता. उत्तर नागपुरात भूखंड माफियांच्या वेगवेगळ्या टोळ्या असून त्यांची मोठी दहशत आहे.

एका टोळीचा प्रमुख असलेल्या आणि सध्या कारागृहात बंदीस्त असलेल्या सक्करदऱ्यातील गँगस्टरने अजनी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हजारेवाडीतील कोट्यवधींच्या जमिनीवर पाच वर्षांपूर्वी कब्जा मारला. यवतमाळच्या गँगस्टरच्या माध्यमातून त्याने सुपारी घेऊन या जमिनीवर कब्जा मारून दिला. ‘भगत भारती’ च्या जोडीला त्यावेळी काही पोलीसही होते. त्यामुळे ज्यांचे येथे भूखंड आहे, ते भूखंडधारक हतबलपणे आपला भूखंड परत मिळावा म्हणून इकडे तिकडे फिरत आहेत. ग्वालबन्सी प्रकरणामुळे या भूखंडधारकांच्या आशा जागृत झाल्या आहेत.

अन्य

Web Title: When did the landlord?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.