एसटी महामंडळाला ‘अच्छे दिन’ कधी ? प्रवासी संख्येत १५ कोटींहून अधिक घट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 06:16 PM2017-12-12T18:16:33+5:302017-12-12T18:17:04+5:30
राज्यात एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. अगोदरच तोट्यात चाललेल्या महामहामंडळाला २०१६-१७ या वर्षात २३०० कोटींहून अधिक तोटा झाला.
ऑनलाईन लोकमत
नागपूर : राज्यात एसटी महामंडळाच्या प्रवासी संख्येत मोठ्या प्रमाणावर घट होत आहे. अगोदरच तोट्यात चाललेल्या महामहामंडळाला २०१६-१७ या वर्षात २३०० कोटींहून अधिक तोटा झाला. तर मागील पाच वर्षांत प्रवासी संख्येमध्ये १५ कोटींहून अधिक घट झाली असल्याची माहिती राज्य शासनाकडूनच देण्यात आली आहे. अशा स्थितीत ‘एसटी’ महामंडळाचे ‘अच्छे दिन’ कधी येतील असा प्रश्न उपस्थित होत आहे.
एसटी महामंडळातील प्रवाशांची घट रोखण्यासंदर्भात संजय दत्त, शरद रणपिसे, रामहरी रुपनवर इत्यादी सदस्यांनी विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी लेखी उत्तरात ही माहिती दिली. २०१६-१७ या वर्षातील अलेखापरीक्षित वार्षिक लेख्यानुसार महामंडळाला २,३१२ कोटी ७२ लाखांचा तोटा सहन करावा लागला आहे. २०१५-१६ मध्ये हाच आकडा १,८०७ कोटी २३ लाख इतका होता, अशी माहिती लेखी उत्तरात नमूद करण्यात आली आहे. एप्रिल २०१२ ते सप्टेंबर २०१७ या कालावधीत प्रवासी संख्येत १५ कोटी ७९ लाख इतकी घट झाल्याचे शासनाकडून सांगण्यात आले आहे.
वर्षनिहाय तोटा
वर्ष तोटा
२०१३-१४ ३८२ कोटी
२०१४-१५ ५७२ कोटी ६२ लाख
२०१५-१६ १,८०७ कोटी २३ लाख
२०१६-१७ २,३१२ कोटी ७२ लाख
उत्पन्नात वाढ करण्याचे प्रयत्न सुरू
दरम्यान, उत्पन्नात वाढ करण्यासाठी एसटी महामंडळाकडून विविध योजना राबविण्यात येत आहेत. प्रवासी वाढवा योजना, आरामदायी आसन व्यवस्था, वातानुकूलित शिवनेरी बसेसची खरेदी, प्रवासी आकर्षित करण्यासाठी समाजातील २४ विविध घटकांना प्रवास भाड्यात सवलत, वार्षिक सवलत कार्ड इत्यादी उपायोजनादेखील करण्यात येत आहेत.