पाणी, रस्ते व प्रवासात सुधारणा केव्हा ?

By admin | Published: September 6, 2015 02:45 AM2015-09-06T02:45:44+5:302015-09-06T02:45:44+5:30

केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर वर्षभरापूर्वी महापौर प्रवीण दटके यांनी महापौरपदाची सूत्रे स्वीकारली.

When do water, roads and travel improvements? | पाणी, रस्ते व प्रवासात सुधारणा केव्हा ?

पाणी, रस्ते व प्रवासात सुधारणा केव्हा ?

Next

महापौरांच्या वर्षपूर्तीचा लेखाजोखा : स्मार्ट सिटीचा किल्ला सर कसा होणार?
नागपूर : केंद्रात भाजपची सत्ता आल्यानंतर वर्षभरापूर्वी महापौर प्रवीण दटके यांनी महापौरपदाची सूत्रे स्वीकारली. काही महिन्यातच राज्यातही भाजप आघाडीची सत्ता आली. केंद्रात व राज्यात भाजपचीच सत्ता असल्याने महापालिकेच्या माध्यमातून शहराचा कायापालट होईल, अशी आशा नागरिकांच्या मनात निर्माण झाली. यासाठी दटके यांनी प्रयत्नही केले. काही विकास प्रकल्प व उपक्रम राबविण्यात त्यांना यश मिळाले. परंतु चांगल्या दर्जाचे रस्ते, पाणीपुरवठा व प्रवासी वाहतूक यासारख्या मुलभूत सुविधा केव्हा मिळणार, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
दटके यांनी महापौरपदाची जबाबदारी स्वीकारण्याला शनिवारी एक वर्ष झाले. सत्तापक्षनेते, जलप्रदाय समितीचे सभापती अशी महत्त्वाची पदे सांभाळल्याने त्यांच्या कार्यकाळात आर्थिक स्थिती चांगली होईल, अशी अपेक्षा होती. परंतु एलबीटीमुळे मनपाची आर्थिक गाडी रुळावरून घसरली. याचा परिणाम विकास कामावर झाला. लोकाभिमुख उपक्रम राबवून त्यांनी मनपाची प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न केला. वृक्षसंवर्धन व पालक परिसर असे लोकसहभागातून उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला. सामाजिक संस्था व कर्मचाऱ्यांच्या श्रमदानातून दर शुक्रवारी स्वच्छता मोहीम हाती घेऊन अंबाझरी व गांधीसागर तलाव स्वच्छ करण्यात आले. जागतिक योग दिनाचा कार्यक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला. पण विसर्जनामुळे पाणी दूषित होत असलेल्या पीओपी मूर्तीच्या निर्मितीवर पूर्णपणे बंदी घालण्यात यश आले नाही. हुडकेश्वर-नरसाळा गावाचा मनपात समावेश करण्यात आला.
नवीन कर प्रणाली लागू करण्यात आली. अस्थायी ९२ कर्मचाऱ्यांना नोकरीत कायम करण्याचा निर्णय, स्वच्छता अभियान राबविण्याचा प्रयत्न असे काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. डेंयूला आळा घालण्याचा प्रयत्न, महिलासांठी सार्वजनिक ठिकाणी शौचालय, कौशल्य व्यवस्थापनाचा प्रयत्न, क्रीडा प्राधिकरणासाठी जागेला मंजुरी, महापौर चषकाच्या माध्यमातून युवा वर्गात खेळाविषयी आवड निर्माण करण्याचा प्रयत्न क रण्यात आला.
आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कर व कर संकलन विभागाचे विभाजन करण्याचा निर्णय घेण्यात आला. मालमत्ता कराच्या वसुलीवर भर देण्यात आला. यात काही प्रमाणात यश मिळाले. परंतु अखंडित पाणीपुरवठा प्रकल्पात सर्वांना नियमानुसार पाण्यासाठी मीटर जोडणी प्रकल्प अद्याप प्राथमिक स्तरावर आहे.
शहराच्या सर्व भागातील नागरिक ांना समान पाणीपुरवठा होण्यासाठी बरीच वर्षे लागतील, असे चित्र आहे. यात दटके यांना अपेक्षित सुधारणा करता आली नाही.
केंद्र सरकारकडून मनपाला २५० बसेस मिळाल्यानंतरही शहरातील प्रवाशांना चांगली सेवा मिळाली नाही. यामुळे मनपाची बदनामी झाली. माजी महापौर अनिल सोेले यांच्या समितीने अहवालात स्टार बसचे कंत्राट रद्द करून नवीन आॅपरेटरची नियुक्ती करण्याची शिफारस केली. परंतु अद्यापही यावर निर्णय झालेला नाही. एवढेच नव्हे तर स्टार खासगी आॅपरेटरने कर न भरल्याने परिवहन विभागाला बसेस जप्त कराव्या लागल्या. परंतु महापौर म्हणून दटके यांना या प्रक रणात ठोस भूमिका बजावता आली नाही.
शहरातील दहनघाटावरील घोटाळ्यामुळे मनपाची बदनामी झाली. परंतु राजकीय दडपणामुळे त्यांना या प्रकरणात कारवाई करण्याचे धाडस दाखवता आले नाही. (प्रतिनिधी)
नागरी सुविधांसाठी प्रामाणिक प्रयत्न
शहरातील नागरिकांना चांगल्या दर्जाच्या नागरी सुविधा मिळतात, असा माझा दावा नाही. परंतु गेल्या वर्षभरात या दृष्टीने भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचा प्रयत्न केला. काही प्रकल्प पूर्ण झाले तर काही पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. यात शंभर टक्के नाही पण ४० ते ४५ टक्के यश आले. पुढील वर्षात अधिक सक्षमपणे काम करू. यात सत्तापक्षनेते, विरोधी पक्षाचे नेते, सर्व पक्षाचे गटनेते, अधिकारी यांचाही तितकाच वाटा आहे.
-प्रवीण दटके, महापौर

Web Title: When do water, roads and travel improvements?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.