राजीनामे कधी देता ? नागपूर शहर भाजपा कार्यालयातील शिपायाचे नगरसेवकांना फोन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 2, 2018 10:52 PM2018-02-02T22:52:01+5:302018-02-02T22:53:18+5:30
शिस्त व परंपरेच्या नावावर भाजपाच्या नगरसेवकांकडून राजीनामे लिहून घेण्यात आले आहेत. यामुळे नगरसेवकांमध्ये कमालीचा रोष आहे. ज्या पद्धतीने राजीनामे मागितले जात आहे ते आमच्या प्रतिष्ठेशी खेळ करण्यासारखे आहे, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शिस्त व परंपरेच्या नावावर भाजपाच्या नगरसेवकांकडून राजीनामे लिहून घेण्यात आले आहेत. यामुळे नगरसेवकांमध्ये कमालीचा रोष आहे. ज्या पद्धतीने राजीनामे मागितले जात आहे ते आमच्या प्रतिष्ठेशी खेळ करण्यासारखे आहे, असे नगरसेवकांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे ज्या नगरसेवकांनी पक्षाकडे राजीनामे सोपविले नाही त्यांना सत्तापक्ष कार्यालयातील शिपायाकडून राजीनामे आणून देण्यासाठी फोन केले जात आहेत.
नगरसेवकांचे राजीनामे मागण्याबाबत भाजपाच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, गेल्या तीन टर्म पासून नागपूर महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. प्रत्येक वेळी निवडणूक जिंकल्यानंतर विभागीय आयुक्तांकडे नोंदणी केली जायची. या नोंदणासाठी जाण्यापूर्वी नगरसेवकांकडून राजीनामा पत्रही लिहून घेतले जायचे. हा पक्षशिस्तीचा भाग होता. ही एक परंपरा असून यात चुकीचे काहीच नाही, असा त्यांचा युक्तिवाद आहे. मात्र, पहिल्यांदाच भाजपाचे नगरसेवक म्हणून महापालिकेत पोहचलेल्या नगरसेवकांमध्ये राजीनामा मागण्यावरून नाराजी आहे. अनेकांनी इच्छा नसतानाही राजीनामे लिहून दिले आहेत. काही वरिष्ठ नगरसेवक विविध कारणांनी अद्याप राजीनामे देऊ शकले नाहीत. राजीनामा पक्षाकडे सादर करायचा आहे. मात्र, त्यांना महापालिकेतील सत्तापक्ष कार्यालयातून शिपायाचे फोन जात असून राजीनामा आणून देण्याच्या सूचना दिल्या जात आहे. यामुळे नगरसेवक नाराज आहेत. आम्ही पक्षाकडे राजीनामा देणारच आहोत. मात्र, असे शिपायाकडून फोन करून राजीनाम्याची विचारणा करणे अपमानास्पद वाटत आहे. शिपायाला तसा अधिकार आहे का, पक्षाचा आमच्यावर विश्वास राहिला नाही का, असा प्रश्न निर्माण झाला आहे, असे एका ज्येष्ठ नगरसेवकाने बोलून दाखविले.
भाजपाचे १०८ नगरसेवक निवडून आले होते. याशिवाय ४ स्वीकृत नगरसेवक आहेत. प्राप्त माहितीनुसार सुमारे १० नगरसेवकांनी अद्यापही राजीनामे सादर केलेले नाहीत. यात काही ज्येष्ठ नगरसेवकांचाही समावेश आहे. गेल्या कार्यकाळात भाजपाच्या काही नगरसेवकांनी शेवटपर्यंत राजीनामे सादर केले नव्हते. त्यांच्यावर कुठलीही कारवाई देखील झाली नव्हती. मात्र, निवडणुकीत यातील काहींचे तिकीट कटल्याचे पहायला मिळाले होते.
चार नगरसेवकांचे पत्र मिळायचे आहे : जोशी
सत्तापक्ष नेते संदीप जोशी यांनी सांगितले की, भाजपाच्या नगरसेवकांकडून राजीनामे घेण्याची पक्षाची परंपरा आहे. यावेळी विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करताना राजीनामे लिहून घ्यायचे विसरून गेले. स्थायी समितीमधील अर्धे सदस्य सेवानिवृत्त होतात.
मात्र, त्यांच्यासोबत उर्वरित सदस्य देखील समितीचा राजीनामा देतात. मात्र, यावेळी राजीनामे घेण्यात आले नव्हते. त्यामुळे २४ जानेवारी रोजी आयोजित पक्षाच्या बैठकीत नगरसेवकांना राजीनामे देण्यास सांगण्यात आले होते. ज्यांनी सादर केले नाही त्यांना कार्यालयातून फोन करण्यात आले असतील. फक्त चार नगरसेवकांचे पत्र येणे बाकी आहे. या प्रक्रियेला एकाही नगरसेवकाने विरोध केलेला नाही, असा दावा त्यांनी केला.