कुटुंबातील तरुणांचे लसीकरण कधी ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:07 AM2021-05-22T04:07:35+5:302021-05-22T04:07:35+5:30
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण : ११,७८,९८५ लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : आतापर्यंत ज्येष्ठांचे लसीकरण समाधानकारक झाले आहेत. परंतु ...
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण : ११,७८,९८५
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : आतापर्यंत ज्येष्ठांचे लसीकरण समाधानकारक झाले आहेत. परंतु लसीचा तुडवडा निर्माण झाल्याने १८ वर्षावरील तरुणांचे लसीकरण थांबवण्यात आले आहे. दुसऱ्या लाटेमध्ये ४५ वर्षाच्या आतील तरुणाई मोठ्या प्रमाणावर बाधित झाली. अनेकांना ऐन तारुण्यात जीव गमवावे लागले. घरातील कर्ता मुलगाच कोरोनाने बाधित होत असल्याने या तरुणांचे लसीकरण कधी होणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
लसीकरणाच्या मोहिमेत नागपूर जिल्ह्याचा विचार केला ४६ लाख ५३ हजार ५७० लोकसंख्या असलेल्या नागपूर जिल्ह्यात आतापर्यंत ११ लाख ७८ हजार ९८५ लोकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यात नागपूर ग्रामीण भागाचा विचार केला तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ५ लाख ४०,७३० नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहेत. यात ४५ वर्षावरील ४ लाख ३९ हजार ४७१ नागरिकांचा पहिला डोस पूर्ण झाला आहे. तर १ लाख १ हजार २५९ नागरिकांचा दुसरा डोस झाला. १८ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला सुरुवातच झालेली नाही. तसेच नाागपूर शहराचा विचार केला तर शहरात आतापर्यंत ६ लाख ३८ २५५ नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. यात ४ लाख ७९ हजार २९६ नागरिकांनी पहिला डोस तर १ लााख ५८ हजार ९५९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला. तसेच १८ वर्षावरील ११,१४१ तरुणांचेही लसीकरण झाले आहे.
१८ वर्षावरील तरुणांच्या लसीकरणाला सुरुवात होताच लसीचा तुटवडा निर्माण झाला. त्यामुळे तरुणांचे लसीकरण सध्या थांबवण्यात आले असून ४५ वर्षावरील नागरिकांच्या लसीकरणाला प्राधान्य दिले जात आहे. यातही दुसरा डोस घेणाऱ्यांचे प्रमाण कमी असल्याने दुसरा डोससाठी अधिक प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे ज्येष्ठांचे लसीकरण व्यवस्थित होत आहे. परंतु कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आल्यापासून ज्येष्ठांना घरातील तरुणांच्या लसीकरणाची चिंता अधिक सतावू लागली आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण : एकूण ११,७८,९८५
पहिला डोस दुसरा डोस
४५ वर्षावरील ९,१८,७६७ २,६०,२१८
१८ वर्षावरील ११,१४१
तरुण कामानिमित्त बाहेर जातात, त्यांनाही लवकर लस मिळावी !
तरुण मंडळी कामानिमित्त बाहेर जातात. त्यामुळे त्यांनाही लवकरात लवकर लस मिळणे आवश्यक आहे. तरुणांसाठी तातडीने ही मोहीम सुरु करण्यात यावी. तसेच लसीचा तुटवडा तातडीने निकाली काढावा.
धनंजय पाटणकर, बेसा
आमच्या दोघांचेही (पती-पत्नी) लसीकरण झाले आहे. परंतु मुलाचे लसीकरण मात्र अद्याप झालेले नाही. घरातील कमावता मुलगा आहे. त्याला दोन लहान मुलं आहेत. कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अशा वेळी घरातील कर्ता पुरुष म्हणून त्याचे लसीकरण तातडीने होणे आवश्यक आहे. प्रत्येकांच्याच घरातील ही चिंता आहे. तेव्हा तरुणांचे लसीकरण तातडीने सुरु व्हावे.
बबन कांबळे