हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बंधनकारक कधी?
By admin | Published: July 23, 2016 03:18 AM2016-07-23T03:18:59+5:302016-07-23T03:18:59+5:30
राज्यात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट कधीपर्यंत बंधनकारक करण्यात येणार यावर उत्तर सादर करण्यासाठी शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला
हायकोर्टात प्रकरण : शासनाने उत्तरासाठी घेतला वेळ
नागपूर : राज्यात हाय सिक्युरिटी नंबर प्लेट कधीपर्यंत बंधनकारक करण्यात येणार यावर उत्तर सादर करण्यासाठी शासनाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला ४ आॅगस्टपर्यंत वेळ मागून घेतला आहे. याप्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यासंदर्भात सत्पालसिंग रेणू यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. मोटर वाहन कायदा-१९८८ व मोटर वाहन नियम-१९८९ अनुसार वाहनांवर फॅन्सी नंबर प्लेट लावणे अवैध असतानाही शहरात असंख्य वाहनचालकांची ‘भाई’गिरी सुरू आहे. अशी हजारो वाहने नागपुरातील रस्त्यांवर धावत आहेत. केंद्र शासनाने २८ मार्च २००१ रोजी अधिसूचना काढून हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेटस्चा नियम लागू केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाने ७ एप्रिल २०११ रोजी सर्व राज्यांना या नियमाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, आजही नंबर प्लेटचा आकार, अंकांचा आकार, रंग इत्यादीसंदर्भातील नियमांचे पालन होत नाही. अनेकजण हिंदी, मराठी, गुजराती, पंजाबी किंवा अन्य प्रादेशिक भाषेत क्रमांक लिहितात.
नंबर प्लेटवर लोगो किंवा चित्र चिपकविलेले असते, असे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. याचिकाकर्त्यातर्फे अॅड. रसपालसिंग रेणू यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)