मुक्या भावनांना फुटला कंठ : ‘मूकबधिर’ मुलीने सादर केले ‘जॉनी जॉनी...’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 12, 2019 11:27 PM2019-03-12T23:27:21+5:302019-03-12T23:30:08+5:30
एकेकाळी मूकबधिर असलेल्या पाच वर्षीय रेणुकाने स्वत:चे नाव सांगत, ‘जॉनी जॉनी यस पापा’ ही कविता सादर करताच दिल्लीहून ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ तपासणीसाठी आलेले पथक अवाक् झाले. त्यांनी मेयो रुग्णालयाच्या ‘ईएनटी’ विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदीसह चमूंचे कौतुक केले. या मेयो रुग्णालयातील ‘ईएनटी’ विभागाच्यावतीने आतापर्यंत १७ चिमुकल्यांवर ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील वर्ष झालेल्या १० चिमुकल्यांना नीट ऐकायला, बोलता येते की नाही त्याची तपासणी करीत पथकाने समाधान व्यक्त केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकेकाळी मूकबधिर असलेल्या पाच वर्षीय रेणुकाने स्वत:चे नाव सांगत, ‘जॉनी जॉनी यस पापा’ ही कविता सादर करताच दिल्लीहून ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ तपासणीसाठी आलेले पथक अवाक् झाले. त्यांनी मेयो रुग्णालयाच्या ‘ईएनटी’ विभागाचे प्रमुख डॉ. जीवन वेदीसह चमूंचे कौतुक केले. या मेयो रुग्णालयातील ‘ईएनटी’ विभागाच्यावतीने आतापर्यंत १७ चिमुकल्यांवर ही यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. यातील वर्ष झालेल्या १० चिमुकल्यांना नीट ऐकायला, बोलता येते की नाही त्याची तपासणी करीत पथकाने समाधान व्यक्त केले.
जन्मजात श्रवणदोषावर ‘कॉक्लिअर इम्प्लांट’ हा अद्ययावत पर्याय आहे. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) ‘कान, नाक, घसा (ईएनटी) विभागात २०१७ मध्ये ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ला सुरुवात झाली. विदर्भातील हे पहिले रुग्णालय ठरले. तेव्हापासून ते आतापर्यंत डॉ. वेदी यांनी १७ रुग्णांवर ही यशस्वी शस्त्रक्रिया केली. या शस्त्रक्रियेनंतर ‘स्पीच थेरपी’ द्यावी लागते. त्यानंतर रुग्णाला चांगले बोलता येते. परंतु ‘इम्प्लांट’ करून एक वर्षे होऊनही अनेक मुलांना बोलता येत नसल्याची अनेक प्रकरणे मध्यप्रदेशासह इतर राज्यातही आढळून आली. या तपासणीसाठी दिल्ली येथील ऑडिओलॉजिस्ट शिल्पी नारंग व दीपक शर्मा या दोन सदस्यीय पथकाने मंगळवारी मेयोच्या ‘ईएनटी’ विभागाला भेट दिली. विशेष म्हणजे, मेयोच्या पहिल्या १० चिमुकल्यांवर केंद्र सरकारच्या ‘स्कीम ऑफ असिस्टन्स् टू डिसेबल पर्सनस फॉर परचेस’च्या (एडीआयपी) मदतीने एका कंपनीचे ‘कॉक्लीअर इम्प्लांट’ वापरण्यात आले होते. याची तपासणी हे पथक करणार होते. परंतु दरम्यान डॉ. वेदी यांनी रुग्णांचा परिचय करून देत, रेणुका रवींद्र शिंदे या पाच वर्षीय चिमुकलीला समोर बोलविले. मूकबधिर असलेल्या रेणुकावर आठ महिन्यांपूर्वीच ‘इम्प्लांट’बसविण्यात आले होते. रेणुकाने स्वत:चे नाव सांगत, इंग्रजीमधील ‘जॉनी जॉनी यस पापा’ ही कविता सादर करताच पथकाने तिचे आणि डॉक्टरांचे कौतुक केले. यावेळी पथकाने उपस्थित बालकांचीही तपासणी केली. त्यांच्यासोबत आलेल्या आई-वडिलांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यांच्या काही शंकांचे निरासनही केले.
यावेळी आयोजित छोट्याखानी कार्यक्रमात आमदार डॉ. मिलिंद माने, पं. दीनदयाल उपाध्याय इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सचे संचालक डॉ. वीरल कामदार, इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूर शाखेचे अध्यक्ष व ईएनटी तज्ज्ञ डॉ. आशिष दिसावल, अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संध्या मांजरेकर उपस्थित होते.