कन्हैयाकुमार कार्यकर्त्यांवरच संतापतो तेव्हा...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2018 06:21 PM2018-12-24T18:21:03+5:302018-12-24T18:21:57+5:30
मानकापूर क्रीडा संकुलात आयोजित ‘संविधान जागर’कार्यक्रमासाठी नागपुरात आलेला जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार हा तसा तर विद्यार्थी चळवळीत समोर आलेला आहे. मात्र बहुतेक प्रसिद्धी मिळत असल्याने तो तळागाळातील जुळलेल्या कार्यकर्त्यांहून स्वत:ला मोठा समजायला लागला आहे. नागपुरात याचेच प्रत्यंतर आहे. न झालेल्या पत्रकारेच्या ठिकाणी त्याच्या सुरक्षेसाठी कडे केलेल्या कार्यकर्त्यांवरच तो केवळ धक्का लागला म्हणून संतापला. त्याच्या रौद्रावतारामुळे कार्यकर्तेदेखील अचंबित झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : मानकापूर क्रीडा संकुलात आयोजित ‘संविधान जागर’कार्यक्रमासाठी नागपुरात आलेला जेएनयूचा विद्यार्थी नेता कन्हैयाकुमार हा तसा तर विद्यार्थी चळवळीत समोर आलेला आहे. मात्र बहुतेक प्रसिद्धी मिळत असल्याने तो तळागाळातील जुळलेल्या कार्यकर्त्यांहून स्वत:ला मोठा समजायला लागला आहे. नागपुरात याचेच प्रत्यंतर आहे. न झालेल्या पत्रकारेच्या ठिकाणी त्याच्या सुरक्षेसाठी कडे केलेल्या कार्यकर्त्यांवरच तो केवळ धक्का लागला म्हणून संतापला. त्याच्या रौद्रावतारामुळे कार्यकर्तेदेखील अचंबित झाले.
वास्तविक नियोजित कार्यक्रम पत्रिकेत दुपारी १ वाजता पत्रकार परिषद व जेवणाची वेळ नमूद होती. परंतु एक तास उशिरा पोहचल्यानंतरही कन्हैयाने ऐनवेळी प्रसार माध्यमांशी बोलण्याला साफ इन्कार केला. संबंधित कार्यालयात गर्दीमुळे एका कार्यकर्त्याचा धक्का लागल्याने कन्हैया त्याच्यावर संतापला. त्याच्यापासून दूर राहण्यास बजावले. कन्हैयाची वागणूक बघून त्याला भेटण्यासाठी आलेले कार्यकर्ते, समर्थक व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी अचंबित झाले. सर्वांना एका युवा नेत्याकडून अशा वर्तणुकीची अपेक्षा नव्हती. चळवळीतून आलेला हा नेता एका छोट्या कारणामुळे त्याच्याच विचारधारेच्या कार्यकर्त्यांवर ओरडतो हे चुकीचे आहे, अशी संतप्त भावना तेथे उपस्थित कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
कन्हैयाकुमारच्या नागपूर दौऱ्याचा कार्यक्रम भारतीय कम्युनिस्ट पक्षाने आधीच निश्चित केला होता. त्यानुसार दुपारी १ ते २ वाजेदरम्यान बजाजनगर येथील लॉनमध्ये पत्रकार परिषद व जेवण करणार होता.
कन्हैयाची पत्रकार परिषद असल्याने प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी दुपारी १ च्या सुमारास एका सामाजिक संस्थेच्या कार्यालयात पोहचले. मात्र कन्हैयाने आयोजकांवरच नाराजी व्यक्त करत प्रसार माध्यमांशी बोलण्याला साफ नकार दिला. वास्तविक आयोजकांनी निर्धारित कार्यक्रमात पत्रकार परिषदेचा समावेश असल्याने प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींना निमंत्रित केले होते. कन्हैयामुळे आयोजकांचीही कोंडी झाली. पत्रकारांना कन्हैयाची एक तास प्रतीक्षा करावी लागली. दुपारी २ च्या सुमारास उशिरा पोहचूनही बोलण्यास नकार दिल्याने पत्रकारांनी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.