जिल्हा न्यायालयाची लिफ्ट बंद पडते तेव्हा...
By Admin | Published: July 2, 2016 03:08 AM2016-07-02T03:08:34+5:302016-07-02T03:08:34+5:30
जिल्हा न्यायालयात शुक्रवारी अचानक तासभर वीज पुरवठा खंडित झाला होता. परिणामी वकिलांसह
अनेकांची तारांबळ : तासभर वीज बेपत्ता
नागपूर : जिल्हा न्यायालयात शुक्रवारी अचानक तासभर वीज पुरवठा खंडित झाला होता. परिणामी वकिलांसह अनेक जण वेगवेगळ्या लिफ्टमध्ये अडकले होते तसेच न्यायालयांचे कामकाजही ठप्प झाले होते. दरम्यान न्यायमंदिर आणि दगडी इमारतीतील वीज पुरवठा गेल्या एक महिन्यापासून वारंवार खंडित होत असल्याच्या कृत्याचा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. प्रकाश जयस्वाल यांनी निषेध केला आहे.
आज दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास न्यायमंदिर इमारतीतील वीज अचानक खंडित होताच चार ठिकाणी सुरू असलेल्या लिफ्टमध्ये वकील,पक्षकार, कर्मचारी, पोलीस जवान आणि आरोपी अडकले होते. त्यापैकी काही ज्येष्ठ वकील होते. न्यायालयीन कर्मचाऱ्यांनीच आठवा मजला गाठून विशिष्ट व्हिलच्या मदतीने त्यांची सुटका केली. यासाठी बराच विलंब लागल्याने काहींचा श्वास गुदमरला होता.
वीज खंडित झाल्याने न्यायालयीन कामकाजही ठप्प झाले होते. तब्बल तासभराच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर वीज पुरवठा सुरळीत झाला होता.
वारंवार वीज पुरवठा खंडित होण्याच्या घटना गेल्या एक महिन्यापासून वाढल्या आहेत. ऐन उकाड्याच्या दिवसात हा प्रकार घडत असल्याने सर्वांचेच अतोनात बेहाल होत आहेत. वकील, न्यायाधीश, पक्षकार आणि कर्मचाऱ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.
उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये महावितरणने न्यायालयांमधील वीज पुरवठा खंडित न होण्याबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे, असे निवाडे दिलेले आहेत. तरीही वीज खंडित होण्याचा प्रकार थांबत नसल्याने या कृतीचा डीबीएने निषेध केला आहे. हा प्रकार कोणत्याही स्थितीत सहन केला जाणार नाही. संबंधित दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली जाईल, असा इशाराही देण्यात आला. (प्रतिनिधी)