आकोली-पांदण रस्त्याचा मेकओव्हर कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 04:37 AM2021-02-05T04:37:25+5:302021-02-05T04:37:25+5:30
कुही : कुही ते नागपूर कळमना मार्केट येथे जाणारा ३० किमी. लांबीचा इंग्रजकालीन आकोली पांदण रस्ता आजही उपेक्षित आहे. ...
कुही : कुही ते नागपूर कळमना मार्केट येथे जाणारा ३० किमी. लांबीचा इंग्रजकालीन आकोली पांदण रस्ता आजही उपेक्षित आहे. या रस्त्याकडे जि.प.बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे. कुही ते नागपूर हा नवीन रस्ता व्हाया पाचगाव फाटा अस्तित्वात यायच्या अगोदर कुही ते आकोली-तितूर-भांडेवाडी-पारडी-कळमना-नागपूर असा सर्वसामान्यांचा मार्ग होता. परंतु नवीन रस्ता सोयींचा असल्याने कुही ते नागपूर हा रस्ता रहदारी साठी योग्य झाला. मात्र जुन्या रस्त्याकडे सर्वांचे दुर्लक्ष झाले. आजही कमी लांबीचा रस्ता उपेक्षित ठेवण्यात आला. नागपूर-नागभीड ही नॅरोगेज रेल्वे सुरू असताना तालुक्यातील नागरिकांना कळमना व इतवारी मार्केट मध्ये जाण्यास सोयीचे होते. त्यामुळे आकोली पांदण रस्त्याची नागरिकांना फारसी गरज वाटत नव्हती. परंतू नॅरोगेज रेल्वेचे रुपांतर ब्राडगेज मध्ये होणार असल्याने गत वर्षी हा मार्ग बंद करण्यात आला. नागरिकांना ७० वर्षे जुन्या रस्त्यांची आठवण झाली. कारण हा मार्ग थेट कळमना व इतवारा मार्केट मध्ये जात असल्याने शेती उत्पादित मालाची विक्री करण्याकरिता सोयीचा होतो. विशेष म्हणजे या रस्त्याचे अंतर फारच कमी असल्याने वेळ व पैसा या दोन्हीची बचत होते. त्यामुळे या मार्गावरील रहदारी वाढलेली आहे. परंत रस्त्याची दयनीय अवस्था पाहून येथील लोकप्रतिनिधी जागृत होतील काय, असा प्रश्न उपस्थित होतो. कुही-वडोदा मार्गावर तहसील कार्यालयाच्या पुढे माजी जि.प.सदस्य दिवंगत मधुसूदन नायडू यांच्या वाडीपासून पुढे अवधूत कॉलेज ते आकोली-चनोडा या जोड मार्गाला जोडणारा पांदण रस्ता पूर्वापार अवागमनाचा आहे. कुही ते अवधूत कॉलेजपर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण संस्था चालक नितीन देशमुख यांनी स्वत:हून केले होते. मात्र त्यापुढील एक ते दीड कि.मी.अंतराचा पांदण रस्ता ‘जैसे थे’ असल्याने पावसाळ्यात चनोडा, भामेवाडा, चितापूर, तितूर या गावांमधील शेतकरी व विद्यार्थी यांना मार्गक्रमणास कमालीचा त्रास सहन करावा लागतो. हा पांदण रस्ता चिखलमय होत असल्याने साधी सायकलही जाऊ शकत नाही. करीता जि.प.बांधकाम विभाग व लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित करीत आकोली पांदण रस्त्याला न्याय द्यावा, अशी मागणी होत आहे.
उल्लेखनीय म्हणजे आकोली पांदण रस्त्याच्या दुतर्फा ऐन रहदारीच्या मार्गावर चुकीच्या पद्धतीने झाडे लावण्यात आलेली आहेत. भविष्यात पांदण रस्त्याचे रुदीकरण केल्यास झाडांची कटाई करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.अशावेळी वृक्ष लागवडीवर झालेला लाखो रुपयांचा खर्च व्यर्थ जाणार, हे मात्र निश्चित!