कामठी रेल्वे स्टेशनचा मेकओव्हर कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:07 AM2021-05-01T04:07:34+5:302021-05-01T04:07:34+5:30
कामठी : जिल्ह्यात सर्वात जुन्या असलेल्या कामठी रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक सुविधांचा अभाव आहे. या सुविधा उपलब्ध करून देण्यात दक्षिण ...
कामठी : जिल्ह्यात सर्वात जुन्या असलेल्या कामठी रेल्वे स्थानकावर अत्याधुनिक सुविधांचा अभाव आहे. या सुविधा उपलब्ध करून देण्यात दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेचे नागपूर मंडळाची उदासीनता दिसून येत आहे. कामठी रेल्वे स्थानकाच्या प्लॅटफाॅर्म क्रमांक १ वर असलेल्या सोयी या प्लॅटफाॅर्म क्र. २ वर नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.
प्लॅटफाॅर्म क्रमांक २ वर डिस्प्ले बोर्ड लावण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहे. पण आजपावेतो ही मागणी पूर्ण करण्यात आलेली नाही. या प्लॅटफाॅर्मवर डिस्प्ले बोर्ड नसल्याने रेल्वेगाडी आल्यानंतर कोच पकडण्यासाठी प्रवाशांची नेहमीच तारांबळ उडते. ऐनवेळी कोच गाठण्यासाठी धावपळ करताना अनेकांचा जीव धोक्यात आला आहे. या रेल्वेस्थानकावर कुलींचा अभाव आहे. त्यामुळे प्रवाशांना साहित्य ने-आण करताना मोठा त्रास सहन करावा लागतो. या प्लॅटफाॅर्मवर डिस्प्ले बोर्ड लावण्याचे कार्य सुरू असून येत्या एक ते दोन महिन्यात हे कार्य पूर्ण होणार असल्याचे रेल्वे स्टेशन प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. स्टेशनवर लावण्यात आलेले सीसीटीव्ही गुन्हेगारांचा शोध लावण्यास आरपीएफ चौकीतील जवानांच्या कामाचे नसल्याचे सांगण्यात येते. यामुळे कोणत्याही प्रकरणाचा तपास करण्याकरिता आरपीएफ जवानांना अडचणींचा सामना करावा लागतो. या रेल्वेस्थानकावर १० वर्षांपासून १२ सीसीटीव्ही लावण्यात आले होते. हे सर्व कॅमेरे जुन्या तंत्रज्ञानाच्या आधावर आहेत. नागपूर आणि इतवारी रेल्वे स्टेशनवर अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. यामुळे तेथील आरपीएफ जवानांना गुन्हेगारी प्रकरणातील तपास करण्याकरिता खूप सोयीचे झाले आहे.
- तर आरपीएफला होईल मदत
कामठी स्थानकावर नवीन सीसीटीव्ही लावण्याचा प्रस्ताव आरपीएफच्या वतीने स्टेशन अधीक्षकांकडून उच्चस्तरावर पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव मंजूर होण्याची प्रतीक्षा आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास आरपीएफ जवानांना काम करण्यास सोयीचे होणार असल्याचे आरपीएफ कामठी येथील प्रभारी उपनिरीक्षक मोहम्मद मुगीसुद्दीन यांनी सांगितले.