मोदी, शाह येतात तेव्हा गडकरी गायब असतात
By कमलेश वानखेडे | Published: September 25, 2024 05:29 PM2024-09-25T17:29:36+5:302024-09-25T17:30:09+5:30
Nagpur : विजय वडट्टेवारी यांनी काढले भाजपला चिमटे
नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमीत शाह हे जेवढ्या वेळा विदर्भात येतील तेवढे भाजपचे नुकसान होईल. नशीब लोकसभेत ते नागपूरला नाही आले, नाही तर नितीन गडकरी हरले असते. मोदी, शहा जेव्हा येतात तेव्हा गडकरी गायब असतात. भाजपचे पाय खोलात गेले ते आता बाहेर काढू शकत नाही, असे चिमटे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजप नेत्यांना काढले.
बुधवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, आता आमच्या कडे इंकमिंग सुरू होत आहे. महायुतीकडे अवकाळी पावसाची झळ पोहोचणार आहे. भाजपची धुरा नागपूरच्या लोकांकडे असली की आम्ही बिनधास्त राहू. कारण या लोकांना जनतेनी नाकारले आहे, असेही त्यांनी सांगितले. सरकारला लाडकी बहीण नाही, लाडकी सत्ता आहे. माझा लाडका मतदार आहे, हे त्यांच्या आमदाराच्या मुखातून स्पष्ट झाले आहे.
कायद्यात बदल करा आणि भर चौकात एन्काऊंटर करा
बदलापूर प्रकरणातील आरोपीचा बेकायदा एन्काऊंटर करण्यात आला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खासदार श्रेय घेत आहे. भाजप आणि संघ कार्यकर्यांना वाचविण्याचा प्रयत्न करत आहे. संस्था चालक घरी बसून आराम करत आहे, पोलीस सांगतात फरार आहे. संस्था चालक आरएसएसचे प्रमुख व्यक्ती असल्याने त्यांना अटक झाली नाही. कारवाई केली नाही. हे प्रकरण दाबण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा आरोप वडेट्टीवार यांनी केला.