चळवळ हुकमी झाली की ती वाहावत जाते! राजाभाऊ पोफळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 11:45 PM2020-01-20T23:45:49+5:302020-01-20T23:52:09+5:30

कुठल्याही आंदोलनाची दखल घेतली गेली, त्याला राजकीय पाठबळ मिळाले, शासकीय आधार मिळाला की नंतर त्याची वाताहत होते, ती वाहवत जाते. त्याच स्थितीतून सध्या ग्राहक चळवळ गुजराण करीत असल्याची वेदना राजाभाऊ पोफळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.

When the movement is ordered, it ruin! Rajabhau Pofali | चळवळ हुकमी झाली की ती वाहावत जाते! राजाभाऊ पोफळी

चळवळ हुकमी झाली की ती वाहावत जाते! राजाभाऊ पोफळी

Next
ठळक मुद्देग्राहक चळवळीच्या स्थितीसंदर्भात व्यक्त केली नाराजीवयाच्या ८३ व्या वर्षीही चित्तवृत्ती अजूनही शाबूत

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : १९७१-७२ चा काळ असेल. भाई बर्धन, साठे आणि दत्तोपंत ठेंगडी यांच्या कामगार आंदोलनांचा जोर वाढत होता. त्याचदरम्यान नागपुरात महालातील एका शमीवृक्षाच्या खाली भारतीय मजदूर संघाचे संस्थापक दत्तोपंत ठेंगडी व राजाभाऊ पोफळी इतर कार्यकर्त्यांसोबत त्या दिवशी पार पडलेल्या यशस्वी संपाबाबत चर्चा करीत बसले होते. त्याचवेळी तेथे रा. स्व. संघाचे द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आले आणि आंदोलनात भरडल्या गेलेल्या ग्राहकांवर कटाक्ष टाकला. त्यांच्या त्या शब्दातून ग्राहकांच्या एकजुटीचा बिगुल वाजला आणि ग्राहक चळवळीचा पाया रोवला गेला. या चळवळीचे पहिले खांदेकरी ठरले ते राजाभाऊ उपाख्य दत्तात्रय गोपाळराव पोफळी. आज ते वयाची ८३ वर्षे पूर्ण करीत आहेत. प्रकृतीने अगदी जर्जर झाले आहेत. मात्र अशाही परिस्थितीत त्यांची चित्तवृत्ती शाबूत आहे आणि ग्राहक चळवळीविषयी ते भरभरून बोलतात.
कुठल्याही आंदोलनाची दखल घेतली गेली, त्याला राजकीय पाठबळ मिळाले, शासकीय आधार मिळाला की नंतर त्याची वाताहत होते, ती वाहवत जाते. त्याच स्थितीतून सध्या ग्राहक चळवळ गुजराण करीत असल्याची वेदना राजाभाऊ पोफळी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली. खरे तर समाजासाठी कायदे असतात. मात्र, सध्या कायद्यासाठी समाज आहे का? अशी शंका समाजातील एकूणच वैचारिक स्थितीवरून त्यांनी व्यक्त केली. कामगार आंदोलनाच्या काळात उद्योगपती घराण्यांचा विरोध करताना प्रत्येक व्यापारी हा ग्राहक असतो, याचे भान नव्हते. हे भान जेव्हा आले तेव्हा ग्राहकहितासाठी काम करण्याची गरज भासली. तेव्हाही ग्राहकहिताचे कायदे होते. मात्र जागृती नव्हती आणि ते कायदे पाळले जात नव्हते. म्हणूनच १९७१-७२ मध्ये उपभोक्ता मंच उभी राहिले. द्विसाप्ताहिक सुरू झाले आणि १९७४ मध्ये विदर्भासाठी काम करणाऱ्या या संघटनेचे रूपांतरण अखिल भारतीय ग्राहक पंचायतमध्ये झाल्याचे राजाभाऊ सांगत होते.
या संस्थेची धुरा दत्तोपंत ठेंगडी यांनी माझ्या खांद्यावर दिली. त्या काळात आंदोलने हिंसक व उग्र असत. आम्हीही तीव्र होतो मात्र वात्रट नव्हतो. त्याबद्दल वैचारिक विरोधक असलेले भाई बर्धन यांनीही कौतुक केले आणि नंतर आमच्या आंदोलनाचे अनुकरण सुरू झाल्याचेही त्यांनी सांगितले. समाजाभिमुखतेसाठी सुरू झालेल्या ग्राहक चळवळीने अनेक यश पदरात पाडले आणि ग्राहकांचे हित साधले गेले. मात्र, आता ही चळवळ समाजाभिमुख असल्याचे दिसत नसल्याची खंतही राजाभाऊंनी व्यक्त केली. कायद्याच्या कचाट्यात अडकून पडलेली ग्राहक चळवळ, असे वर्तमान स्थितीसंदर्भात भाष्य करता येईल, असे ते यावेळी म्हणाले.

Web Title: When the movement is ordered, it ruin! Rajabhau Pofali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.