सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलच्या ओपीडीचा गोंधळ संपणार कधी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2019 12:48 AM2019-03-08T00:48:28+5:302019-03-08T00:49:11+5:30
रुग्णांची वाढती संख्या व रुग्ण हिताला प्राधान्य देऊन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध विभागांच्या बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) दिवस बदलविण्यात आले. तसेच सोईसाठी ओपीडीच्या रचनेतही बदल करण्यात आले. परंतु रुग्ण संख्येत वाढ झाल्याने ओपीडीची जागा अपुरी पडत आहे. नोंदणी कक्षाची रांग, तपासणीच्या प्रतीक्षेत बसलेले रुग्ण आणि औषधे घेणाऱ्यांची लांबच लाब रांग एकाच ठिकाणी येत असल्याने गोंधळ उडत आहे. विशेष म्हणजे, गंभीर आजाराच्या रुग्णांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रुग्णांची वाढती संख्या व रुग्ण हिताला प्राधान्य देऊन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये विविध विभागांच्या बाह्यरुग्ण विभागाचे (ओपीडी) दिवस बदलविण्यात आले. तसेच सोईसाठी ओपीडीच्या रचनेतही बदल करण्यात आले. परंतु रुग्ण संख्येत वाढ झाल्याने ओपीडीची जागा अपुरी पडत आहे. नोंदणी कक्षाची रांग, तपासणीच्या प्रतीक्षेत बसलेले रुग्ण आणि औषधे घेणाऱ्यांची लांबच लाब रांग एकाच ठिकाणी येत असल्याने गोंधळ उडत आहे. विशेष म्हणजे, गंभीर आजाराच्या रुग्णांना तासन्तास रांगेत उभे रहावे लागत आहे.
मध्यभारतात केवळ नागपुरात सुपर स्पेशालिटी हॉपिटल आहे. यामुळे विदर्भासह आजूबाजूच्या राज्यातून रुग्ण येतात. सध्या या हॉस्पिटलमधून हृदय शल्यचिकित्सा, (सीव्हीटीएस), हृदयरोग (कार्डिओलॉजी), मेंदूरोग (न्यूरोलॉजी), मज्जातंतूची शल्यक्रिया (न्युरोसर्जरी), मूत्रपिंड विकार (नेफ्रालॉजी), मूत्र रोग (युरोलॉजी), पोटाचे विकार (गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी) व ‘एन्डोक्रेनॉलॉजी’ अशा आठ विभागातून रुग्णसेवा दिली जाते. परंतु या विभागाच्या बाह्यरुग्णाची (ओपीडी) वेळ सकाळी ८.३० ते दुपारी १ वाजेपर्यंत असल्याने आणि प्रत्येक विभागाच्या ओपीडी आठवड्यातून दोनच दिवस असल्याने त्या-त्या दिवशी रुग्णांची प्रचंड गर्दी होते. एखाद्या दिवसाला शासकीय सुटी आल्यास त्या विभागाच्या दुसऱ्या दिवसाला तर बाह्यरुग्ण विभागाच्या परिसरात पाय ठेवायला जागा राहत नाही. जसे, सोमवारी महाशिवरात्रीची सुटी आल्याने गुरुवार ७ मार्च रोजी रुग्ण व नातेवाईकांची प्रचंड गर्दी उसळली. औषधांसाठी लागणारी रांग ‘सिटी स्कॅन’ विभागापर्यंत पोहचली होती तर नोंदणी कार्ड काढणाऱ्यांची रांग ही खासगी औषधालयापर्यंत लागली होती. ओपीडीची वेळ संपायला आली तरी रांग मात्र कायम होती. विशेष म्हणजे, औषधांच्या रांगेत ज्येष्ठ नागरिक व सामान्य नागरिकांची एकच रांग राहते. येथे बसण्याचीही सोय नाही. यामुळे रुग्णांना अडचणीचे जात आहे. याची जाणीव रुग्णालय प्रशासनाला आहे, परंतु काय उपाययोजना कराव्यात हा प्रश्न त्यांच्या समोरही असल्याचे दिसून येते.
गंभीर रुग्णांना फटका
रुग्णांची वाढती गर्दी लक्षात घेऊन व रुग्णहिताच्या दृष्टीने आठही विभागाचे ओपीडीचे दिवस बदलविण्यात आले. ओपीडीच्या रचनेतही बदल करण्यात आले. परंतु त्यानंतरही ओपीडीची जागा अपुरी पडत आहे. एकाच ठिकाणी रुग्णांची गर्दी वाढल्याने कुणाचा नंबर आला याची माहिती रुग्णांपर्यंत पोहचत नाही. परिणामी, रुग्णारुग्णांमध्ये भांडणे वाढली आहेत. गंभीर रुग्णांना याचा फटका बसत आहे.